⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | आता अंजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल! रब्बीसाठी होणार फायदा

आता अंजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल! रब्बीसाठी होणार फायदा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२४ । यंदा मान्सून पाऊस चांगला बरसला असून यामुळे जिल्हयातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ झाली. अनेक छोट्या मोठ्या प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे. यात आता एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पळासदड (ता. एरंडोल) येथील अंजनी मध्यम प्रकल्प ७८ टक्के असून प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने सुरु आहे. अजूनही पाण्याची आवक सुरुच असल्याने प्रकल्पाची शंभरीकडे सुरु असलेली वाटचाल दिलासादायक ठरली आहे.

जळगाव जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने पाणी टंचाई मिटली आहे. दरम्यान, यावर्षी पावसाळा संपत आला तरी अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होत नसल्याने पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या प्रकल्पातून एरंडोल शहरासह कासोदा व परिसरातील आठ गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एक महिन्यापासून अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात चांगला पाऊस होत असल्यामुळे या प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली असून जलसाठ्यात झपाट्‍याने वाढ होत आहे. अंजनी धरणात गुरुवारी सकाळी ७८ टक्के जलसाठा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पाण्याची आवक अशीच सुरु राहिल्यास, दोन ते तीन दिवसातच प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

रब्बीसाठी होणार फायदा
अंजनी प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के झाल्यानंतर रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी या प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या आवर्तनाचा फायदा होतो. सुमारे आठशे हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळतो. याशिवाय धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास अंजनी नदीपात्रातून पाणी सोडले जाते.

अंजनी प्रकल्पाची पाण्याची पातळी २२५.३७ मीटर झाली असून एकूण जलसाठा १५.९२४ दश लक्ष घनमीटर इतका झाला आहे. यातील उपयुक्त जलसाठा १२.१५२ दश लक्ष घनमीटर इतका असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.