⁠ 

अमृत महोत्सव लेखनमाला : पहिल्या विश्वयुद्धाचा महासंग्राम १०९ क्रांतिकारांचे एकाच क्षणी हौतात्म्य  

सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग- ९

भारतात रुजलेल्या ब्रिटीश साम्राज्यवादाचा पाडाव करण्यासाठी, देश-विदेशातील भारतीय तरुणांनी सशस्त्र क्रांतीच्या ज्वाला एका भीषण ज्वालामुखीच्या उद्रेकात बदलण्यासाठी गनिमी सैन्य मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. १९१४ च्या उत्तरार्धात आणि १९१५च्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धाचे ढग सरसावू लागले. जर्मनीने इंग्लंडला वेढा घातला. ब्रिटीश सैन्य युरोपियन देशांमध्ये अडकले. त्यामुळे भारतात तैनात असलेले बहुतांश ब्रिटीश सैन्यही इंग्लंडचे अस्तित्व वाचवण्यासाठी युरोपीय देशांमध्ये व्यस्त झाले. अशा वेळी क्रांतिकारकांनी भारतात ब्रिटीशांविरुद्ध १८५७ सारखा सशस्त्र लढा उभारण्याची योजना आखली.

भारताला स्वतंत्र करण्यासाठी परदेशात लढणाऱ्या गदर पक्षाच्या लढवय्यांनी भारतात येऊन क्रांतीचा झेंडा रोवला. रासबिहारी बोस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली, अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये सक्रिय भारतीय क्रांतिकारक, सामूहिकपणे हजारो लोक जलमार्गाने भारताकडे रवाना झाले. गदर पार्टीच्या हाकेवर भारतीय तरुणांनी या देशव्यापी लष्करी बंडात सहभागी होऊन आपल्या प्राणांची आहुती देण्याच्या निर्धाराने ‘मारो ब्रिटिशर्स को’चा नारा दिला.

अमेरिका-कॅनडातून हाँगकाँग, सिंगापूर, रंगूनमार्गे भारतात येणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकांनी, या देशांमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना; आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी उठाव करण्याचा सल्ला दिला. सिंगापूरमध्येही तैनात असलेली लष्करी तुकडी तयार होती.

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर १९१४ मध्ये हजारो भारतीय जापानी जहाजांद्वारे देशात आले. त्यात पंजाबी लोकांची संख्या सर्वाधिक होती. या सर्व लढवय्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्यांना काम देण्याची जबाबदारी रासबिहारी बोस यांच्यावर सोपवण्यात आली होती. बनारसला केंद्र बनवून ही सर्व व्यवस्था करण्यात आली. १९१४ मध्येच क्रांतिकारक भाई परमानंद, बाबा पृथ्वीसिंग आझाद, पंडीत काशीराम, कर्तार सिंह सराभा इत्यादी सर्व सक्रिय क्रांतिकारक भारतात पोहोचले.

बंगाल आणि बिहारची जबाबदारी बागजतीन यांच्याकडे देण्यात आली. अमेरिकेतून भारतात आलेले क्रांतिकारक; विष्णू गणेश पिंगळे यांच्याकडे दिल्ली आणि उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली. कर्तार सिंह सराभा या १८ वर्षीय तरुणाला पंजाब आणि सिंधमध्ये बंड पुकारण्याची आज्ञा देण्यात आली होती. सर्व ठिकाणच्या लष्करी छावण्यांमध्ये जाऊन उठाव मिळवण्यासाठी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली. १९१५ च्या सुरुवातीला बनारसमध्ये प्रमुख क्रांतिकारकांची तातडीने बैठक आयोजित करण्यात आली होती. २१ फेब्रुवारी १९१५ रोजी रासबिहारी बोस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संपूर्ण देशात एकाच वेळी सशस्त्र क्रांती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लुधियाना, अमृतसर, जब्बेवाल इत्यादी ठिकाणी बॉंब बनवण्याचे गुप्त कारखाने सुरू झाले. अमेरिकेतून प्रकाशित होणारे ‘गदर’ हे मासिक छापण्यासाठी भारतात भूमिगत मुद्रणालयाचीही स्थापना करण्यात आली. १३ जानेवारी १९१५ रोजी प्रकाशित झालेल्या गदर मासिकाच्या अंकात भारतीयांना सांगण्यात आले, “देशवासियांनी परदेशात जाऊन शस्त्र बनवण्याचे प्रशिक्षण घ्यावे. या लोकांना परदेशातून शस्त्रास्त्रांची खेप भारतातील स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांकडे पाठवण्याचीही व्यवस्था करण्यात यावी.”

त्याप्रमाणे ही महान क्रांती यशस्वी करण्यासाठी क्रांतिकारकांनी जर्मनीकडून शस्त्रास्त्रे आणि पैसा मिळवण्यासाठीही प्रयत्न केले. त्यासाठी बँकॉक, शांघाय आणि बटाविया येथील सर्व जर्मन राजदूतांशी चर्चा करण्याचे ठरले. क्रांतिकारक ज्योतिंद्रनाथ (बाघा जतीन) आणि अमरेंद्र नाथ चटर्जी यांनी ही सर्व व्यवस्था हाती घेतली. परदेशातून मिळालेली शस्त्रे जलमार्गाने भारतात पाठवण्याचे काम क्रांतिकारकांचे जनक म्हणवल्या जाणारे; लाला हरदयाल हे करत होते आणि बाघा जतीनने देशाच्या विविध बंदरांवर शस्त्रे उतरवून सर्व क्रांती केंद्रांवर वितरित करण्याचे गुप्त काम हाती घेतले.

क्रांतिकारक विनायक कापले यांनी बंगालमधून पंजाबमध्ये शस्त्रे पाठवण्यास सुरुवात केली. अलाहाबादमध्ये बंड घडवून आणण्यासाठी शाळेतील शिक्षक दामोदर पुढे आले. जबलपूरमध्ये नलिनी बागची यांची लष्करी छावण्यांमध्ये विद्रोहाचा संदेश आणि माहिती कार्यासाठी निवड करण्यात आली. रासबिहारी बोस स्वतः क्रांतिकारक संन्याल आणि पिंगळे यांच्यासोबत लाहोर आणि अमृतसरला रवाना झाले. पंजाबमधील खेड्यापाड्यातील शेतकरी वर्गाने विशेष उत्साह दाखवला. सशस्त्र युद्ध सुरू करण्यासाठी आवश्यक शस्त्रे, साहित्यिक साहित्य, राष्ट्रध्वज इत्यादी सर्व ठिकाणी पाठवण्यात आले. इंग्रजांविरुद्ध उघड बंड आणि युद्धाची घोषणा करणारा जाहीरनामाही जारी करण्यात आला.

 लाहोर ते ढाका पर्यंत सशस्त्र युद्ध करण्यासाठी अनेक संघटनात्मक तयारी केल्याबद्दल, अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी क्रांतिकारक नेत्यांच्या बौद्धिक कौशल्याची, विशेषत: रासबिहारी बोस, पिंगळे, सच्चिंद्रनाथ, सत्येंद्रनाथ, बाघा जतीन इत्यादींची प्रशंसा केली. हजारो छोट्या-छोट्या ठिकाणी क्रांतिकारकानी तैनात होणे, लाखो कामगारांची जमवाजमव करणे आणि सैनिकांना बंड करण्यासाठी लष्करी छावण्यांमध्ये जाणे हे अत्यंत जोखमीचे होते. देशद्रोही आणि आपापसांत लपून बसलेल्या फितुरांना सामोरे जाणे; हे अशा वेळी महत्त्वाचे काम होते.

या स्वातंत्र्यलढ्याला चालना देण्यासाठी पैशांची गरज होती. कोणत्याही मार्गाने पैसे मिळवण्याच्या विचारात क्रांतीच्या चालकांनी फिरोजपूर जिल्ह्यातील मोगा उपविभागाची तिजोरी लुटण्याची योजना आखली. अमेरिकेत गदर चळवळीचे संस्थापक; पंडीत काशीराम यांच्या नेतृत्वाखाली १५ क्रांतिकारकांनी राज्याच्या तिजोरीवर हल्ला केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या कामात दोन क्रांतिकारक हुतात्मे झाले. ७ जणांना अटक करण्यात आली, तर बाकीचे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या ७ क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. ज्यांनी एकही खून केलेला नव्हता.

अमेरिकेतून भारतात परतलेल्या कर्तारसिंग सरभाला आता पंजाबमधील बंडखोर कार्रवायांचे शिल्पकार बनवण्यात आले. वाचकांच्या माहितीसाठी; हे कर्तारसिंग सराभा अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या ‘गदर’ मासिकाच्या संपादक मंडळाचे सदस्यही होते. यतींद्रनाथ मुखर्जी हा आणखी एक होतकरू तरुण; जो अमेरिकेतून परतला होता. त्याला भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये पाठविण्यात आले. 

यावेळी ब्रिटीश सैन्य युरोपात सुरू झालेल्या महायुद्धात व्यस्त होते. भारतात त्यांची संख्या खूपच कमी होती. ‘गदर’चे नेते परदेशातून आले आणि त्यांनी भारतातील इंग्रजांचा पाडाव करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. संपूर्ण देशातील; विशेषत: पंजाब, उत्तर प्रदेश आणि बंगालमधील तरुण २१ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहत होते. ‘मारो ब्रिटीशोंको’च्या मागील उत्कट भावनेने क्रांतिकारक तरुण मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याकरिता तळमळत होते.

सशस्त्र क्रांतीची सर्व तयारी पूर्ण झाली. सगळ्यात सुरुवातीला सेनेच्या इंग्रज अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले गेले. या बरोबरच गैर इंग्रज अधिकाऱ्यांची यादी बनवली गेली. कारागृहांवर हल्ला करून सर्व प्रकारच्या कैद्यांना सोडवून सशस्त्र क्रांतीत सहभागी करून घेणे आणि सरकारी खजिना लुटण्याची युद्धनीती आखली गेली होती. सैनिक छावण्यांमधील शस्त्रे लुटून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणे; अश्या प्रकारची पद्धत वापरली गेली होती. सैनिकी छावण्यांमध्ये जाऊन, भारतीय सैनिकांना बंडखोरीसाठी आधीपासूनच तयार करून ठेवले होते. २१ फेब्रुवारी १९१५ चा ठरवल्या गेलेला दिवस जवळ येत होता.

परंतु देशाचे आणि देशासाठी सर्वस्व त्यागणाऱ्या क्रांतिकारकांचे दुर्भाग्य असे, कि एका बंडखोरामुळे सगळ्या पराक्रमी सशस्त्र योजनेवर पाणी फेरले गेले. कृपाल सिंह नावाचा एक राष्ट्रघातकी आणि इंग्रजभक्त ‘गदर’ योजनेत सहभागी होऊन सर्व प्रकारच्या हालचालींची माहिती घेत गेला. जरी रासबिहारी बोस यांनी त्याला ओळखून; संपवण्यासाठी आपल्या साथीदारांना सांगितले होते, तरी सुद्धा पंजाबच्या क्रांतिकारकांनी या बंडखोराला संपवून न टाकता आपल्या कैदेतच ठेवून स्वातंत्र्य संग्रामाला सुरुवात करण्याची तारीख १९ फेब्रुवारी निश्चित केली.

क्रांतीची तारीख २ दिवस आधी करण्याची सूचना कृपाल सिंह याने सुध्दा ऐकली होती. त्याने काहीतरी करून ती तारीख आणि सशस्त्र खिलाफत चळवळीची सगळी माहिती इंग्रजांपर्यंत पोहचवली. बंडखोरीचा रंग दाखवून सगळे फिसकटले. या दुष्ट कृपाल सिंहने तेच केले; जे जयचंद, मीर जाफर यांसारख्या देशद्रोह्यांनी केले होते. या प्रकारे काही मूठभर नीच आणि स्वार्थी तत्वांमुळे १८५७चा स्वातंत्र्यसंग्राम, वासुदेव बळवंत फडके यांचा विद्रोह आणि सतगुरू रामसिंह यांचे स्वातंत्र्य संग्रामाचे आंदोलन अयशस्वी झाले.

सरकार सावध झाले. ज्या घरात क्रांतिकारकांनी कृपाल सिंहला कैद करून ठेवले होते, त्या घरी पोलिसांचे दल पोहचले आणि घराचा कसून तपास केला. मोठ्या प्रमाणात बाँब, बंदुका, गुप्त दस्तऐवज आणि बरेच क्रांतिकारक पुरावे सरकारच्या हाती लागले. क्रांतीची पूर्ण योजना समजल्यानंतर सरकारने देशातील सर्व छावण्यांमध्ये जागरूकता राखण्याचा बंदोबस्त केला. या सर्व ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना काढून त्या जागीं इंग्रज सैनिकांना तैनात करण्यात आले. बंडखोरी ची शक्यता असण्याचा अंदाज लावून सैनिकांच्या तुकड्यांना क्रांतिकारकांनी निश्चित केलेल्या स्वातंत्र्ययुध्दाच्या सुरुवातीच्या ठिकाणी पहारा ठेवला. सरकारी खजिन्यांवरचे पहारे सुद्धा मजबूत केले गेले.

याच वेळी एक इंग्रजभक्त नवाब खान सुद्धा भारतात आला. त्याने याआधी अमेरिकेत गदर पार्टीत सहभागी होऊन सगळी गुपिते आणि पद्धतींची माहिती घेतली आणि भारतात येऊन खबरी बनला. या बंडखोरांच्या माहितीवरून सरकारने गदर पार्टीच्या बऱ्याच सैनिकांना अटक केली. एवढे करूनही सरकार थांबले नाही, तर बंडखोरीमध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्य; परंतु निर्दोष भारतीय सैनिकांना सुद्धा गोळी मारून हत्या करण्यास प्रारंभ केला.

या संभाव्य विद्रोहाला पूर्णपणे संपवण्यासाठी सरकारने ‘डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट’ पास केला. या कायद्याच्या अंतर्गत एक समिती स्थापन केली गेली; जिने सर्व अटकेत असलेल्या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा देण्याचे काम आपल्या हाती घेतले. या जिवंत हुतात्म्यांना आपली बाजू मांडण्याची कोणतीही सुविधा दिल्या गेली नाही. सरकारची अत्याचारी नीती होती. लोभी, स्वार्थी आणि भ्याड लोकांना साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरून इंग्रजभक्त बनवणे, त्यांच्या मदतीने क्रांतिकारकांना पकडणे, त्यांना कारागृहात डांबून यातना देणे, न्यायालयाचे नाटक करणे आणि फाशी देणे; अशा प्रकारची कारस्थाने चालत होती.

या संभाव्य विद्रोहाच्या ज्वाला पूर्णपणे विझवण्यासाठी सरकारने आंधळ्या कायद्याचा वापर करून, अत्याचाराच्या सर्व सीमारेषा पार केल्या. भारतीय सैनिकांना आणि देशभक्त क्रांतिकारकांना गोळ्या घालणे किंवा फाशी देणे आणि निर्वासित करण्याची अमानवीय मालिका वेगाने सुरू होती. अत्याचारांचा हा बीभत्स खेळ सरकारने उघडपणे खेळला. ३७ सैनिक आणि क्रांतिकारकांना फाशी देऊन मारले. ७२ जणांना गोळ्या घालण्यात आल्या. १३ क्रांतिकारक कारागृहातच हाल अपेष्टा सोसल्यामुळे मृत्युमुखी पडले. जवळ-जवळ इतकेच क्रांतिकारक पोलिसांशी लढता-लढता शहीद झाले. अत्याचाराच्या क्रूरतेमुळे देशात नीरव शांतता पसरली.

वास्तविक १९१५चा तो स्वातंत्र्यसंग्राम अपयशी होण्याची बरीच कारणे होती. महायुद्धामध्ये अडकलेल्या इंग्रजांनी एक खोटे आश्वासन दिले, कि या युध्दाच्या समाप्तीनंतर भारताला एक वसाहत राज्याचा दर्जा देण्यात येईल. काँग्रेसचे दोन्ही गट या आश्वासनात फसले.

खरी गोष्ट ही आहे की १८५७चा स्वातंत्र्यसंग्राम; इंग्रजांच्या अत्याचारी व भेदभाव करणाऱ्या नीतीमुळे राजनैतिक पातळीवर अयशस्वी झाला, तर १९१५ ते १९१७चा हा स्वातंत्र्यसंग्राम; काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या इंग्रजांना साथ देण्याच्या कारणामुळे न लढताच अयशस्वी झाला. ए. ओ. ह्युमने स्थापन केलेल्या काँग्रेसच्या या व्यवहारामुळे भारतात कोसळणारा ब्रिटीश साम्राज्यवाद पुन्हा घट्ट झाला आणि नंतर त्याला मुळापासून उपटून टाकण्यासाठी अजून ३० वर्षे लागली; हेच तर दुर्दैव आहे आपल्या भारतीयांचे!

क्रमश:

नरेंद्र सहगल, पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार

मराठी अनुवाद – अविनाश काठवटे