३ तास ऑफिस बाहेर बसूनही खडसेंना अमित शहांनी नाही दिली भेट – गिरीश महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । खडसे अमित शहांच्या ऑफिस बाहेर जवळपास तीन तास बसले. पण अमित शहांनी खडसेंना वेळ दिला नाही. असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ते चाळीसगावमध्ये बोलत होते.
यावेळी ते म्हणाले कि, अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर एकनाथराव खडसे आणि रक्षाताई खडसे बसल्याची माहिती मला मिळाली. मला अमित शाहांच्या कार्यालयाबाहेरून एक फोन आला होता. यानंतर मी रक्षाताईंना फोन करून याबाबत विचारलं. तेव्हा रक्षाताईंनी मला सांगितलं की,आम्ही अमित शहांच्या ऑफिस बाहेर जवळपास तीन तास बसलो. पण आम्हाला वेळ दिला नाही किंवा अमित शाहांनी भेटायला नकार दिला
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा होती. तेव्हापासूनच खडसे हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चेना उधाण आले आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात एकनाथ खडसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याजवळ आले होते. यावेळी खडसेंनी फडणवीसांना सोबत बसून जे काही असेल ते मिटवून टाकू, जाऊ द्या, अशी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला.