जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । अमळनेर येथील औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकर करण्यासाठी ॲड.ललिता पाटील यांनी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. विस्तारीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली.
मंगरूळ येथील औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी, तसेच मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन स्तरावरून निधी मिळावा, अशी मागणी वसाहतीचे चेअरमन जगदीश चौधरी व संचालक मंडळाने केली होती. सहकारी औद्योगिक वसाहतीची स्थापना होऊन शासकीय जमिनीवर उद्योगासाठी १९८० मध्ये प्लॉट वितरित झाले. सध्या लहानमोठे असे ७५ उद्योग या ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र, वसाहतीला कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसल्यामुळे रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, ड्रेनेज इत्यादी सुविधा पुरवण्यास अडचणी येत आहेत. उद्योजकांना मूलभूत सुविधा नसल्यामुळे समस्या येत आहेत.
मूलभूत सुविधा द्याव्या
सहकारी उद्यौगिक वसाहतीसाठी केंद्रशासन स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी, मूलभूत सुविधा मिळाव्यात अशी विनंती ॲड.ललिता पाटील, बाजार समिती संचालक पराग पाटील यांनी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन ॲड.ललिता पाटील व पराग पाटील यांनी एमआयडीसीला निधी देण्याची मागणी केली.