⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी, अमळनेरच्या शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । महाराष्ट्रात घातक उष्णतेची लाट सुरू असून ही लाट २ एप्रिलपर्यंत जळगावसह पाच जिल्ह्यांत कायम राहणार आहे. अशातच जळगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा फटका बसल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

ही घटना अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे घडली आहे. जितेंद्र संजय माळी असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी जितेंद्र परिसरातील गावांत खमण विक्रीसाठी गेला होता. दुपारी १२ वाजता घरी आल्यानंतर तो स्वतःच्या शेतात मका काढण्यासाठी गेला. भर उन्हात दिवसभर काम केल्याने सायंकाळी त्याला शेतातच भोवळ आली. त्याचा चुलत भाऊ महेंद्र काशीनाथ माळी यांच्यासह शेतातील अन्य मजुरांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रथमोचार करून जितेंद्र याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

उष्माघात सदृश्य लक्षणे असल्याने जितेंद्र माळी यांचा मृत्यू झाला असं स्थानिक डॉक्टरांचे म्हणणं आहे. तर मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याची अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आशिष पाटील यांनी माहिती दिली. दरम्यान, माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर योग्य तो खुलासा होईल. या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा चांगलाच तापला असून आज सकाळपासूनच सुर्य आग ओकू लागला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज बुधवारी देखील तापमानाचा पार 44 अंशाच्यावर येऊन पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघात वा अन्य विकारांवर तात्काळ उपाययोजनाची अंमलबजावणी करीत आरोग्य यंत्रणेस सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले.