मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२५ । राज्यात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून अशातच आता मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा विचित्र अपघात झाला असून यामध्ये अमळनेरच्या दाम्पत्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर या अपघातामध्ये १४ जण जखमी आहेत, त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय.
नेमकं काय घडलं?
नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला. माल वाहतूक ट्रकला, बस व मागील एकूण चार गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अमळनेरचे पियुष पाटील आणि त्यांच्या पत्नी वृंदा पाटील यांचा समावेश आहे. तर १४ जण अपघातात जखमी झाले आहेत. या जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय.
पियुष व वृंदा मकर संक्रांतीनिमित्त घरी आले होते व रात्री खाजगी ट्रॅव्हल्सने मुंबईकडे परत निघाले होते. मात्र, त्यांचे हे मुंबईला परत जाणे त्यांच्या आयुष्याचे शेवटचे ठरले. पियुष मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होता, तर वृंदा उच्चशिक्षित असून माहेर असलेल्या बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. अपघातात त्यांची अडीच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे व तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या दुर्दैवी निधनाने मारवड गावात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, प्रशासनाने या घटनेची दखल घेतली आहे.