⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | हवामान | सावधान : जळगावातील हवा तुमच्यासाठी अतिशय घातक

सावधान : जळगावातील हवा तुमच्यासाठी अतिशय घातक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरासह जिल्ह्यातील हवा प्रचंड प्रदूषित झाली असून नागरिकांसाठी अतिशय घातक असल्याची आकडेवारी सोशल साईट्सवर उपलब्ध आहे. जळगावातील प्रदूषित हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक तपासाला असता १५० पेक्षा अधिकच आहे. हवेतील मोठ्या घातक धूलिकणांचे प्रमाण डब्ल्यूएचओच्या मानकापेक्षा तब्बल ५ टक्के अधिक आहे. केवळ दिवाळीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशी देखील निर्देशांक सरासरी १२० च्या पुढेच असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी असलेली प्रदूषित हवा जळगावकरांसाठी मारक असून जीवघेणी देखील आहे. आपण घराच्या बाहेर पडणे म्हणजे आजाराला आमंत्रण देणे अशीच परिस्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात खराब रस्ते, वाहनांची वाढती संख्या, डम्पिंग ग्राऊंड, काँक्रीटीकरण, धुलीकणांचे वाढते प्रमाण, वाढती बांधकामे यामुळे हवेच्या दर्जावर परिणाम होऊ लागला आहे. शहरात गेल्या काही वर्षापासून अमृत योजना, भुयारी गटारीचे काम सुरु असल्याने प्रत्येक गल्ली आणि रास्ता खोदलेला आहे. रस्त्यांची डागडुजी वरवर माती, मुरूम, खडीचा कच टाकून केली जात असल्याने दिवसभर धुळीचे साम्राज्य निर्माण होते. शहरात उड्डाणपूल, महामार्गाचे काम देखील सुरु असून त्यामुळे देखील प्रचंड धूळ निर्माण होते. महामार्गावरून होणाऱ्या रहदारी, अवजड वाहतुकीमुळे वाहनातून निघणारे दूषित वायू हवेत मिसळून हवा प्रदूषित होते. जळगाव शहराची जशी परिस्थिती आहे त्यापेक्षा तालुक्यांची स्थिती चांगली आहे असे फारसे चित्र नाही.

जिल्ह्यातील मोजक्याच तालुक्यात रस्ते तयार झाले असल्याने प्रदूषण होण्याचे प्रमाण कमी आहे. कारखाने, लहानमोठे उद्योग उभारताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून योग्य ते निकष तपासले जात नाही, राज्य प्रदूषण मंडळाकडून नियमांची कडक अंमलबजावणी होत नसल्याने देखील हवेतील प्रदूषण वाढत आहे. रात्रभर होणारी अवजड वाहतूक, वाळूचे ट्रॅक्टर, डंपर भरधाव वेगात धावत असल्याने हवा अधिक प्रदूषित होत असते. रस्त्यावरून धुळीला कंटाळून नागरिकांच्या आंदोलनानंतर शिवाजीनगर आणि ममुराबाद रस्यावर सायंकाळी पाण्याचा फवारा मारण्यात येत असतो.

अशी आहे आकडेवारी

जळगाव शहर आणि जिल्ह्यातील हवेच्या प्रदूषणाची सोशल साईट्सवर असलेली आकडेवारी तपासली असता फार धक्कादायक आहे. एका सोशल साईट्सनुसार जळगावातील दि.४ रोजीचा प्रदूषित हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक १६८ आहे तर दुसऱ्या साईट्सच्या आकडेवारीनुसार १५२ आहे. गुणवत्ता निर्देशांक १५० पेक्षा अधिक असल्यास ती हवा श्वसनासाठी घातक आहे. जळगावच्या हवेतील मोठ्या म्हणजेज PM2.5 धूलिकणांची संख्या डब्ल्यूएचओच्या वार्षिक हवेच्या गुणवत्ता मार्गदर्शक मूल्यापेक्षा तब्बल ५.६ पट जास्त आहे. सोशल साईट्सने अनेक खबरदारीचे उपाय सांगितले असून त्यात चक्क घराबाहेर पडू नये, मास्कच वापर करावा, एअर प्युरिफायर बसवावे इतकंच काय तर घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवावे अशा सूचना सुचविलेल्या आहेत.

जळगावकरांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा

खराब रस्ते आणि महामार्गाचे सुरु असलेले काम यामुळे धुळीचे लोटच्या लोट दिवसभर उडत राहतात. हवामानामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे वाढत असलेला उष्मा, संध्याकाळी धूळ आणि धुरक्याच्या मिश्रणाची बदलती ‘हवा’ जळगावकरांच्या पचनी पडत नाही. चंदूअण्णा नगर, सावखेडा रोड परिसरात डम्पिंग ग्राउंड, दिवसरात्र सुरु असलेला धूर, एमआयडीसी परिसरात कंपनीतून बाहेर पडणारा धूर, घातक वायू यामुळे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडते आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. एसपीएम (सस्पेंडेड पार्टिक्युलेटेड मॅटर) मध्ये धुके, धूळ आणि धूर या घटकांचा समावेश असतो. तर आरएसपीएम (रेस्पीरेटेल सस्पेंडेड पार्टिक्यूलेटेड मॅटर) मध्ये आठ मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या कणांचा समावेश असतो. या घटकांचे हवेतील प्रमाण इतर घटकांपेक्षा वाढले की श्वास घ्यायला त्रास होणे, खोकला येणे, नाक चोंदणे, सर्दीमुळे हैराण होणे, नाकातून पाणी गळत राहण्याचा त्रास वाढतो. साथीच्या आजारांचा जोर शहरात असताना या भागातील धुरके व धुळीमुळे त्वचेवर लाल पुरळ उठणे, चट्टे येणे, अंगाला खाज सुटणे, पांढरे चट्टे असे त्रास होतात. स्त्रियांच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण आधीच कमी असते, लोहाची रक्तात तूट असेल तर त्वचाविकार, श्वसनविकारांचा संसर्ग लगेच होतो. धुळीमुळे केवळ श्वसनविकार, दमा बळावत नाही तर धुळीचे कण कानात गेले तर श्रवणक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो. हा परिणाम दृश्य स्वरूपातील व पटकन होणारा नसला तरीही कालांतराने ही क्षमता कमी होत जाते. अनेकजण घरात धूळ येऊ नये म्हणून खिडक्या दरवाजे सतत बंद ठेवतात, पण धुळीला चाप लावताना सूर्यप्रकाशही अडवला जातो, त्यामुळे लहान मुलांना नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या कॅल्शियमचाही अभाव आढळून येतो. तसेच घरातील दमटपणा वाढल्याने श्वसनसंदर्भातील आजार देखील बळावतात. वारंवार श्वास लागण्याच्या, धाप लागण्याच्या तक्रारींमुळे मुलांना कमी वयात नेब्युलायझर, अस्थमा पंप वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्याचा अधिक प्रमाणातील वापरही आरोग्यास हितावह नसल्याचे डॉक्टर स्पष्ट करतात. या धुळीच्या अलर्जीमुळे त्वचा व डोळ्यांवरही परिणाम होतो. डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येण्यासारखा त्रास होतो. हवेत कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असेल श्वासातून तो शोषला जातो, त्याची रक्तातील पातळी वाढली तर लोह तयार करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ऑक्सिजन पातळी खालावून चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे ,डोक्याचा मानेखालील भाग दुखत राहण्याचा त्रास हवेतील धुळीमुळे वाढतो. धुळीचे लोट वाऱ्यासोबत वाहत राहिले वा कोंडीमुळे प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरिरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ होते. कार्बनचे प्रदूषित हवेतील वाढते प्रमाण नाक चोंदण्याच्या तक्रारींसह कोणत्याही वस्तूचा गंध घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम करते. गर्भवती महिलांमध्ये प्रदूषणामुळे त्वचाविकार बळावले तर प्रतिजैविकेही घेता येत नाही. खोकल्याची उबळ वाढल्याने मूत्रमार्गावरील ताबाही जातो, त्यामुळे गर्भावस्थेमध्ये त्रास होण्याची शक्यता असते.

वाहतूक पोलीस लावतात जीवाची बाजी
जळगावातील धुळीचा सामना करीत दिवसभर शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी विविध सिग्नलवर तसेच महामार्ग शाखेचे कर्मचारी महामार्गावर आपले कर्तव्य बजावत उभे असतात. धूळ आणि वाहतूक कोंडीतून होणारे हवेचे प्रदूषण हा गंभीर विषय आहे. जिल्ह्यात शेकडो कर्मचारी वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. कामाची दगदग, ताणतणाव, अनियमित जेवण, अपुरी विश्रांती या जोडीला वाढत्या प्रदूषणामुळे वाहतूक पोलीस देखील जेरीस आले आहेत. वाहनांमधून निघणारा काळा धूर आणि धुलीकण यामुळे पोलिसांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहेत. त्यातच वाढती आर्द्रता आणि गरम हवेमुळे आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. डोळे चुरचुरणे, श्वास घेताना त्रास होणे, दम लागणे, उन्हात सतत उभे राहून अशक्तपणा जाणवत आहे. प्रदुषणापासून त्रास होऊन नये म्हणून पोलीस मास्क वापरतात मात्र हे मास्क बांधल्याने चेहऱ्यावर चट्टा उमटतो. चेहरा धुतल्यानंतर हातरुमालाने पुसल्यावर संपूर्ण रूमाल काळा पडतो, एवढे जळगावात प्रदूषण आहे.

धुळीने होतो बेजार : वाहतूक पोलिसाची खंत
जळगावात सकाळी साडेसात वाजल्यापासूनच वाहनांची वर्दळ सुरू होते. धूळ आणि वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेकदा डोळे चुरचुरतात, खोकला येतो, दिवसभर घशात खरखर असते, मळमळल्यासारखे वाटते. तोंडाला मास्क बांधल्यास आणखी घुसमट होते. विशेषतः वर्दळ कायम असलेल्या ठिकाणी नेमणूक असल्यास जास्तच त्रास जाणवतो. जळगावात उन्हाचा पारा देखील अधीक असून त्या रखरखत्या उन्हात सातत्याने प्रदूषणात उभे राहून कधी डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखी वाटते.

– राजेंद्र उगले, वाहतूक कर्मचारी

 

आपल्या मनात येणारे काही प्रश्न :

१. वायू प्रदुषणासाठी विरुद्ध काही कायदे आहेत का ?

उत्तर : होय. ‘Air Act (Prevention and Control of Pollution) 1981’.

२. हवेची गुणवत्ता कशी तपासल्या जाते ?

उत्तर : हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘वायू गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index)’ चा उपयोग केला जातो.

३. वायू गुणवत्ता निर्देशांका वरून आपल्याला काय समजते ?

उत्तर : हा एक निर्देशांक आहे जो हवेची गुणवत्ता दर्शवितो. यावर ० – ५०० असे अंक दिलेले असतात. ज्या हवेचा निर्देशांक ० – ५० मधे असतो ती शुद्ध हवा तर ३०१ – ५०० निर्देशांकाची हवा धोकादायक असे समजले जाते.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.