⁠ 
रविवार, मे 5, 2024

अमळनेरला ‘पीएमएफएमई’ अंतर्गत कृषी प्रक्रिया जनजागृती पंधरवडा, मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभागाचा उपक्रम; शेतकऱ्यांचा मोठा सहभाग!

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । कृषी विभागात आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अर्थात ‘पीएमएफएम’ योजनेंतर्गत सध्या कृषी प्रक्रिया जनजागृती पंधरवडा (१५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२२) साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याने व कृषी विभागातर्फे २४ ऑगस्ट तालुक्यातील शेतकऱ्यांची मंगळ ग्रह मंदिर येथे कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत तालुक्यातील जवळपास १३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी कार्यशाळास्थळी रानभाजी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, ‘पीएमएफएमई’ योजनेचे जिल्हा समन्वयक समाधान पाटील, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी, योगेश वंजारी, कृषी सहायक अमोल कोठावदे, प्रगतिशील शेतकरी व साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस संदीप घोरपडे, मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील आदी व्यासपीठावर होते.

श्री. वारे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. मंगळग्रह सेवा संस्थेने १० दिवसांत तालुक्यातील १५४ गावांत पीक विमा जनजागृतीसाठी रथयात्रेचे आयोजन कारून बहुमोल सहकार्य केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांचे विशेष आभार मानले . यापुढेही अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. श्री. घोरपडे यांनी ‘शेती आणि शेतकरी’ या विषयावर अहिराणीतून मार्गदर्शन करून अहिराणी बोलीमुळे उपस्थितांची मने जिंकली. समाधान पाटील यांनी योजनेचा उद्देश, लाभार्थी साठीची पात्रता, भांडवली गुंतवणुकीचे निकष, आर्थिक मापदंड, सामायिक पायाभूत सुविधा, अर्ज करण्याची पद्धत, बचत गटांचे योगदान, बँकेसंदर्भातील अडचणींवर कशी मात करावी आदींसंदर्भात मार्गदर्शन केले. श्री. जाधवर यांनी कृषी विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसह ‘पीएमएफएमई’ ही योजना शेतकऱ्यांसाठी कशी लाभदायी आहे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी किती उपयुक्त आहे, याबाबत मार्गदर्शन केले. मंगळग्रह सेवा संस्थेच्या सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी हिंगोणे बुद्रुकचे सरपंच कोमलसिंग जाधव, शिरूडचे सरपंच गोविंद सोनवणे, सात्रीचे सचिन बोरसे, गांधलीचे प्रगतिशील शेतकरी धनंजय कुलकर्णी, योगीता लांडगे, सोनाली सोनवणे, चोपडाई कोंढावळच्या वैशाली पाटील, सात्री येथील भाग्यश्री बोरसे यांच्यासह महिला बचत गटांच्या अनेक प्रतिनिधी उपस्थित होत्या. कृषी पर्यवेक्षक दीपक चौधरी यांनी आभार मानले.

प्रदर्शनात १८ रानभाज्यांचा समावेश
कार्यशाळास्थळी लावण्यात आलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनात कटुर्ले, तोंडली, आर्वी, शेवगा, कुर्डू, पोकळा, आंबटचुका, फांगोडा, अंबाडी,. घोळ, तांदूळजा, लाल अंबाडी, लाल माट, चिवळ, तरोटा, गुळवेल, सुरण, शेंदोडी, केना, गवती चहा आदींचा समावेश होता. त्याविषयीही उपस्थितांना संबंधितांनी माहिती दिली.