⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अ‍ॅड. उज्वल निकम झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत झळकणार!

जळगाव लाईव्ह न्यूज : १० एप्रिल २०२३ : मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. उज्वल निकम यांचे नाव संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे. कायदे पंडित म्हणून आपण त्यांना टिव्हीवरील डिबेट्स अर्थात चर्चासत्रांमध्ये पाहतच असतो. मात्र आता ते एका मराठी मालिकेत देखील झळकणार आहेत. ही मराठी मालिका म्हणजे, झी मराठी वरील लोकप्रिय ‘अप्पी आमची कलेक्टर’.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या लोकप्रिय मराठी मालिकेत अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. तिला येणार्‍या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे. या मालिकेचे कथानक एका उत्कंठावर्धक क्षणावर येवून ठेपली आहे. कारण अप्पीने नुकतीच युपीएससीची लेखी परीक्षा पास केली असून तिचा आता इंटरव्ह्यूव होणार आहे.

या इंटरव्ह्यूवच्या निमित्ताने अ‍ॅड. उज्वल निकम आणि आणि प्रसिध्द लेखक तथी माजी आयएसएस अधिकारी विश्वास पाटील एका विशेष भुमिकेत छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने हे दोन ऑफिसर्स टेलीव्हिजनवर प्रथमच मालिकेत खरीखुरी भूमिका साकारताना दिसणार आहेत. सामाजिक जबाबदर्‍यांचे भान असणारे आणि शासकीय कामकाज जवळून पाहणारे उज्वल निकम आणि विश्वास पाटील तिची कशी मुलाखत घेणार, कसा अभिनय करणार हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

अ‍ॅड. उज्वल निकम यांच्याबद्दल थोडक्यात माहिती…

अ‍ॅड. उज्वल निकम यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जळगाव जिल्हा न्यायालयात केली. त्यानंतर त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय खटल्यांपर्यंत काम केले. ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी लढविलेल्य खटल्यांमुळे ६२८ जणांना जन्मठेपेची आणि ३७ फाशीची शिक्षा झाली आहे. यात अनेक हाय-प्रोफाइल खटल्यांमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. सरकारी वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दिला खर्‍या अर्थाने कलाटणी मिळाली, १९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे. १३ मार्च १९९३ ला, मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. बॉम्बब्लास्टशी संबंधित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या १०० पेक्षा जास्त सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी, निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात १२३ आरोपींपैकी १०० आरोपी दोषी आढळले, तर १२ दोषींना विशेष डाटा कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली.

उज्ज्वल निकम यांनी हाताळलेले महत्त्वाचे खटले

कल्याण बॉम्बस्फोट (१९९१ )
मुंबई बॉम्बस्फोट खटला (१९९३)
गुलशन कुमारची हत्या (१९९७)
गेटवे ऑफ इंडिया बॉम्बस्फोट (२००३)
मरीन ड्राईव्ह बलात्कार प्रकरण (२००५)
खैरलांजी हत्याकांड (२००६)
प्रमोद महाजन यांची हत्या (२००६)
मुंबई दहशतवादी हल्ले (२००८)
मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार (२०१३)
कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरण (२०१६)