⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

एरंडोलच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये मुरूम व कच टाका!

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । एरंडोल येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये रस्त्याची दुरावस्था होऊन प्रचंड चिखल झाले असून मुरूम व कच टाकण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, माजी नगरसेविका वर्षा शिंदे यांच्यासह नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग क्रमांक एक मधील नवीन वस्तीत काही ठिकाणी गटारी नाहीत, परिणामी गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन चिखल होत आहे. तसेच सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल झाले आहे. ठीक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहन काढायला नाहक त्रास सहन करावा लागत असून नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुरूम व कच टाकून रस्ता तात्काळ दुरुस्ती करावा. शिवाय नवीन प्रभागातील नगरपालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी शंभर टक्के भरली असताना येथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी अमित पाटील, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, नगरसेविका वर्षा शिंदे, राजेंद्र शिंदे, डॉ. अरविंद बडगुजर शेखर पाटील, नरेंद्र गायकवाड, जी.एस. वेताळे, किरण पाटील, यांच्यासह प्रभाग क्रमांक एक मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.