जळगाव लाईव्ह न्यूज । नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. शोएब शेख गुलाम नबी उर्फ शोएब बिल्डर (वय ३५, रा. ख्वाजा नगर, नशिराबाद) याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

शोएब शेख गुलाम नबी याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, रस्त्यात अडवून गंभीर दुखापत करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन यासह विविध गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती. मात्र, त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने पोलिसांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांकडून तक्रार करण्यासही भीती व्यक्त केली जात होती. त्याच्या कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ४ सप्टेंबर २०२६ रोजी शेख गुलाम नबी उर्फ शेख बिल्डर याला ताब्यात घेऊन स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गवित, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलिस अधिकारी केकर बारवाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता एम. नरवाडे व त्यांच्या पथकाने कारवाई केली.त्यात पोउपनि प्रिया दातीर, पो.हे.काँ. गुणवंत देशमुख, पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, पो.कॉ. प्रविण लोहार तसेच स्था.गु.शा.चे स.फौ. सुनिल दामोदरे अशांनी परिश्रम घेतले आहेत.







