जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । जामनेर तालुक्यातील बेटावद येथील युवकाच्या खुनानंतर पोलिस व नगर परिषद प्रशासनाने जामनेर शहरातील सात ते आठ कॅफेवर संयुक्त कारवाई केली. शहरातील कॅफे सेंटरमध्ये अश्लील प्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्यांनतर ही कारवाई करण्यात आली असून साहित्य जप्त करण्यात आले. न.पा.प्रशासनाने या सर्व कॅफेना सील ठोकले असून दुकान मालकांना नोटीस बजावणार आहे. यापुढे कोणत्याही कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करू असा इशारा पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिला आहे.

अल्पवयीन मुलीसोबत जामनेरातील कॅफेमध्ये बसल्याच्या संशयावरून बेटावद येथील सुलेमान रहीम खान या तरुणाला काही तरुणांनी मिळून कॅफेतून बाहेर काढून मारहाण केली होती. त्यानंतर हा तरुण घरी गेला. घरी गेल्यावर पाणी पिताच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात अपहरण, मॉब लिचिंग व खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुलेमान रहीम खान याच्या मृत्यूनंतर तीन दिवसांपासून जामनेरात तणावपूर्ण शांतता आहे. त्यानंतर बुधवारी पोलिस निरीक्षक मधुकर कासार, नगर परिषदेचे बांधकाम अभियंता अमर राऊत, स्वच्छता निरीक्षक अमित आहेर, विजय सपकाळे यांनी शहरातील आठ कॅफेंची तपासणी केली. जामनेरात कॅफेच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय चालवले जात होते. कारवाई करताना आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. दुकान मालकांना नोटीस बजावणार आहे.
दुकान मालकांनी गाळे भाडे कराराने देताना संबंधितांनी आवश्यक परवानग्या घेतल्या आहे का याची चौकशी करावी. संपूर्ण चौकशी केल्यानंतरच गाळे भाडेतत्वावर देण्याविषयी निर्णय घ्यावा. मधुकर कासार, पोलिस निरीक्षक, जामनेर जामनेरातील कॅफेमध्ये गैरप्रकार होतात, अशी तक्रार अनेक दिवसांपासून होती. या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आठ कॅफेतील साहित्य जप्त करण्यात आले. कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याचे पुरावे या ठिकाणावरून सापडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.











