11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई, तरी अहवाल निरंक; रावेरातील प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ

फेब्रुवारी 27, 2026 11:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला असून रावेर मधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाकडून 11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यात येऊनही शिक्षण विभागाकडून मात्र कॉफीची कारवाई निरंक दाखवण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

student

दरम्यान, या प्रकाराबाबत संबंधित केंद्र संचालकांकडे खुलासा मागवण्यात आला असून खुलासानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने अचानक तपासणी केली. यावेळी पथकाला तब्बल ११ विद्यार्थ्यांकडे कॉपीचे साहित्य मिळून आले. पथकाने या ११ जणांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून तशी माहिती केंद्र संचालकांकडे सोपवली. नियमानुसार, ही माहिती तातडीने बोर्डाकडे जाणे अपेक्षित होते.

धक्कादायक बाब म्हणजे, भरारी पथकाच्या कारवाईनंतर अवघ्या अडीच तासांत नाशिक बोर्डाच्या वतीने जिल्ह्याचा सुधारित अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी केस झाली नसल्याचे (निरंक) नमूद करण्यात आले होते. भरारी पथकाने पकडलेले ते ११ विद्यार्थी आणि त्यांच्यावरील कारवाईची कागदपत्रे अडीच तासांत गायब झालीच कशी? असा संतप्त प्रश्न आता विचारला जात आहे. केंद्र संचालकांनी ही माहिती लपवली की बोर्डाच्या स्तरावर काही ‘अदृश्य’ हालचाली झाल्या, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, या प्रकारावर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. केंद्र संचालकांनी ही माहिती वरिष्ठांपर्यंत का पोहोचवली नाही आणि अहवालात ‘निरंक’ कशी दाखवली, याबाबत संबंधित केंद्र संचालकांकडे लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. हा खुलासा समाधानकारक नसल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now