⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव शहरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, १० ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । शहरातील अवैध धंदे हटावसाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या सूचनेनंतर सर्व कामाला लागले आहेत. बुधवारी रात्री सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी अयोध्यानगर, तांबापूरा, शनीपेठ परिसरासह इतर भागात गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. यात एमआयडीसी पोलीस हद्दीत तीन ठिकाणी, जिल्हापेठ हद्दीत चार ठिकाणी तर शनीपेठ पोलिसांनी तीन ठिकाणी असे एकुण १० ठिकाणी छापा टाकला. यात ११ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ४ लाखाचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव लाईव्हने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जळगाव शहरात दोन दिवसांपुर्वी सट्टा व जुगार अड्ड्यांवर पोलीस अधिक्षकांसह पथकाकडून धाडसत्र राबविण्यात आाले होते. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री विना परवाना गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून कारवाई केली आहे. यात एमआयडीसी पोलिसांनी आयोध्या नगर परिसरात प्रमोदकुमार नरेश सैनी (वय १९) याच्या राहत्या घरात छापा टाकला असता त्यात २ लाख ७२ हजार ३०० रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. तांबापुरा भागात मच्छी मार्केट परिसरात गजानन विष्णू भोई (वय ३९,रा.गवळीवाडा) याच्याकडून २ हजार ४२० रुपयांचा गुटखा पकडला तर दिलीप आत्माराम भोई याच्याकडून १ हजार ३२० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

शनीपेठ पोलिसांनी नेरी नाका चौकात नितीन भिका महाजन (वय ४६,रा.कासमवाडी) याच्याकडून २ हजार २०० रुपयांचा वाल्मिक नगरात राहूल गोकुळ कोळी (वय २७) याच्याकडून ७ हजार ३१५ तर शनी मंदिर परिसरात चंद्रकांत सुभाष बाविस्कर याच्याकडून २ हजार २२० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या हद्दीत चार ठिकाणी कारवाई करुन १० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. चारही जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भजे गल्लीत मुस्ताक रशीद पिंजारी (वय ४९), अल्ताफ अकबर पटेल (वय २३) स्टेडियम संकुलात सुनील बाबुराव विसपुते (वय ४५), चोपडा मार्केटमध्ये ज्ञानेश्वर बन्सी सपके (वय ५२) यांचा समावेश आहे. जिल्हापेठ, एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण १० ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यात ११ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख रूपये किंमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा :