जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी एका सराईत आंतरराज्यीय चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ६ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे भुसावळ, जामनेर, अमळनेर आणि चोपडा परिसरातील दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ शहरातील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंगमधून सुमारे १५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी विजय जगन्नाथ खडके यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहेनवाल आणि पोलीस कॉन्स्टेबल कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी चोपडा बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपले नाव विशाल राजेंद्र राठोड (वय ४६, रा. भीकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने भुसावळसह जामनेर आणि अमळनेर परिसरातूनही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून एकूण सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस नाईक अब्दुल रज्जाक खान तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुबोध मोरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि दीपक पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.










