गुन्हेजळगाव जिल्हा

फसवणुकीतील आरोपीवर बनावट आधारकार्ड, नकली नोटा बनविण्यासह खुनाचा गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । मेहरुणमधील प्लॉटची विक्री करण्यासाठी बनावट आधार, पॅनकार्ड तयार करणाऱ्या संशयिताला खरेदीखतावर असलेल्या फोटोच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून अटक केली. जगन रामचंद नारखेडे (वय ४२, रा. भालेगाव, ता. मलकापूर, जि. बुलडाणा) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बनावट नोटा तयार करणे, खून व फसवणूक असे गुन्हे दाखल आहेत.

व्यापारी सुरेश मांगीलाल बाफना (रा. सुयोग कॉलनी) यांच्या मालकीचा जळगाव शहर महापालिका हद्दीत मेहरूणमधील शेत सर्व्हे क्रमांक १६३/१ ‘ब’ मधील बखळ प्लॉट क्रमांक १७ असून त्याची किंमत ३५ लाख रुपये आहे. हा प्लॉट इम्रान मुख्तार तांबोळी (रा. प्लॉट क्रमांक ४५, इंद्रप्रस्थनगर, एमआयडीसी) याने खरेदी केलेला आहे. त्याबाबत दुय्यम निबंधक जळगाव- १ यांच्याकडे तसा दस्त क्रमांक ७५६/२०२१ नुसार खरेदीखत नोंदवून प्लॉट खरेदी केला आहे. बाफना याच्या प्लॉटवर त्याचे नाव लावलेले आहे. खरेदीखत करताना अरुणा दिलीप चौधरी (वय ५२, रा. एलआयसी कॉलनी) व फारुख शेख रहेमदुल्ला खाटीक (वय ४७, रा. मास्टर कॉलनी) यांनी हजर राहून खरेदी लिहून घेणार व लिहून देणार यांना ओळखतात, अशी खोटी माहिती सांगून त्यांनी सर्वांनी संगनमताने बाफना यांच्या नावाचे आधारकार्ड व पॅनकार्ड बनावट तयार केले. ते खरे असल्याचे भासवून त्या कागदपत्रानुसार बाफना यांच्या प्लॉटची खरेदी करून फसवणूक केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अरुणा चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. ‘त्या’ सद्य:स्थितीत कारागृहात आहेत. बनावट आधारकार्ड तयार करून प्लॉटची खरेदी करून देणाऱ्या नारखेडे याच्याविषयी एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पोलिस नाईक मुदस्सर काजी यांना माहिती मिळाली होती. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी करताना खरेदी खतावर संशयित नारखेडे याचा फोटो होता. त्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. त्यानुसार पथक मलकापूर येथे गेलेले होते. त्याला सहाय्यक फाैजदार अतुल वंजारी, मुदस्सर काजी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे यांच्या पथकाने अटक केली.

ठाणे, नगर, इगतपुरीसह जळगाव जिल्ह्यातही गुन्हे दाखल
नारखेडे याच्याविरुद्ध सन २००९ मध्ये नकली नोटा तयार केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यानंतर सन २०१३मध्ये नकली नोटा तयार केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. इगतपुरी पोलिस ठाण्यात सन २०२० मध्ये फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. श्रीरामपूर, अहमदनगर येथे खून प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अशा प्रकारचे गुन्हे करण्यात तो सराईत आहे. एमआयडीसी पोलिसांत दाखल गुन्ह्यातील इतर संशयितांचा पोलिस शोध घेत आहे.

Related Articles

Back to top button