⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Accident : भुसावळ-बोईसर बस खोल दरीत कोसळली; १५ प्रवासी जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । भुसावळ – बोईसर एसटी बसचा पालघर खिंडीत अपघात होऊन ही एसटी बस थेट दरीत कोसळली. हा अपघात आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला असून या अपघातामध्ये सुमारे 15 ते 20 जण गंभीर जखमी झालेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

भल्या पहाटे सकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातस्थळी महसूल, पोलीस आणि एसटी महामंडळ अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य करीत जखमींना पालघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चालक मद्यपान केल्याचा आरोप

भुसावळ-बोईसर मार्गावर वाघोबा खिंडीत एसटी बस आली असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि एसटी थेट 20 ते 25 फूट खोल दरीमध्ये कोसळली. दरम्यान, त्याआधी नाशकात या बसचा चालक बदलण्यात आला होता. बदलण्यात आलेल्या चालकानं दारुचं सेवन केलं असल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. याबाबत कंडक्टरकडे तक्रारही करण्यात आली होती. मात्र मद्यधुंद चालकाबाबतच्या तक्रारींकडे कंडक्टरने दुर्लक्ष केलं असल्याचं प्रवाशांनऊ दावा केला. तसेच नशेत असलेल्या बस ड्रायव्हरने वेगाने गाडी चालवली होती. भयंकर पद्धतीनं बस चालवत असलेल्या या चालकाचं अखेर वाघोबा खिंडीत नियंत्रण सुटलं आणि त्यामुळेच हा अपघात घडला, असा आरोप जखमी प्रवाशांनी केलाय.