जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात एक भीषण अपघाताची घटना घडली. एका अज्ञात वाहनाने जोरात कट मारल्यामुळे एका पोलीस हवालदाराची कार थेट ४० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, नशिबाने ही कार एका झाडाला जाऊन अडकल्याने कारमधील चौघे जण सुखरूप बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार दिनेश बारड (वय ५१) हे आपल्या कुटुंबासह अमळनेर येथून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यासोबत कारमध्ये पत्नी तेजश्री बारड (वय ४८), मुलगी नंदिनी बारड (वय २२) आणि मुलगा वेदांत बारड (वय १८) असे एकूण चार प्रवासी होते. त्यांची (एम.एच.०१-बी.वाय.५३७१) कार रविवारी दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास घाटात आली. यावेळी एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरात कट मारला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दरीच्या दिशेने झेपावले.

वाहन वेगाने खाली जात असताना काही अंतरावर असलेल्या मोठ्या झाडांमध्ये जाऊन अडकले. यामुळे वाहन खालपर्यंत गेले नाही आणि मोठा अनर्थ टळला. अपघाताचा आवाज ऐकताच घाटातील इतर प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले. दरीत झाडांमध्ये अडकलेल्या वाहनातून जखमींना बाहेर काढणे आव्हानात्मक होते, मात्र स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अत्यंत कष्टाने दोन महिला आणि दोन पुरुषांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.









