जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२३ । एकीकडे महिलांसह मुलींवर होणारे अत्याचार कमी होत नसून दुसरीकडे जळगावातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. जळगावातील शासकीय बालसुधार गृहात एका १० वर्षीय मुलावर १३ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
जळगावातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शासकीय मुलांचे बालसुधार गृहमध्ये ३१ ऑगस्ट रोजी रात्री १० वर्षीय बालक झोपलेला असतांना सोबत राहणारा १३ वर्षीय मुलाने त्याला झोपेतून उठवून वरच्या मजल्यावर नेले. तिथे बाथरूमच्या समोरील जागेत त्याला लाथ मारून खाली पाडले व त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केली.
हा प्रकार कुणाला सांगितला तर मारहाण करण्याची धमकी दिली. बालसुधारगृहाचे अधिक्षक रविकिरण अहिरराव यांनी पिडीत बालकाला विश्वासात घेवून चौकशी केली असता घडलेला प्रकार त्याने कथन केला. यानंतर बुधवार १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता बालसुधारगृहाचे अधिक्षक रविकिरण अहिरराव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख करीत आहे.