⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

अबब… पाचोरा रेल्वेस्थानक आवारात सापडले १३ तोळे सोन्याचे दागिने

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । पाचोरा येथील रेल्वेस्थानक आवारात 13 तोळे वजनाचे 6 लाख 6 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सापडल्याने खळबळ उडाली असून या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान पाचोरा पोलीसात तपास केला असता गेल्या महिन्याभरात पूर्वी पिंपळगाव येथील कुटुंबीयांची तांदळाची गोणी रेल्वेस्थानकावर हरवल्या प्रकरणी नोंद समोर आले. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली असून यंत्रणेने याचा सखोल तपास करावा व काय ते सत्य बाहेर आणून दूध का दूध पानी का पानी करावे अशी मागणी व अपेक्षा व्यक्त होत आहे.

रेल्वे पोलीस सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार दि. 16 रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रेल्वे कंत्राटी सफाई कामगार असलेल्या उषा गायकवाड या कचरा टाकण्यासाठी पीजे लोकोशेडच्या मागील बाजूस गेल्या. कचरा टाकून परतत असताना त्यांना तेथे हिरव्या रंगाची कॅरीबॅग गाठ बांधलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी ती उचलून त्यांचे सुपरवायझर शरद पाटील यांना दाखवली असता, त्यात काही तरी वस्तू असल्याचे लक्षात आल्याने उषा गायकवाड, शरद पाटील हे आपल्या सहकारी महिला सफाई कामगारांसोबत रेल्वे फलाटावरील लोहमार्ग दूरक्षेत्र पोलीस चौकीत आल्या. हवालदार ईश्वर बोरुडे यांचेकडे त्यांनी कॅरीबॅग सोपवली त्यात पिवळ्या धातूचे काही दागिने आढळल्यानंतर ते बेन्टेक्सचे असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. बोरुडे यांनी मात्र या प्रकरणाची नोंद घेऊन वरिष्ठांना कळवून सराफ असोसिएशनकडे दागिन्यांची तपासणी केली असता ते दागिने सोन्याचे असल्याचे निदर्शनास आले.

सुमारे 13 ग्रॅम वजनाचे 6 लाख 6 हजार रुपये किमतीचे दागिने त्यात मिळून आले. त्यात एक सोन्याचा हार, चार बांगड्या, कानातील एरिंग व साखळीचे टॉप्स, एक चैन, एक पेंडल अशा स्वरूपाचे दागिने आहेत. सदर चे दागिने रेल्वे पोलिसांकडून जप्त करण्यात आले असून याप्रकरणी रात्री उशिरा नोंद करून सदरचे दागिने चाळीसगाव रेल्वे पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पाचोरा शहर पोलिसांना लोहमार्ग पोलिसांकडून माहिती पाठविण्यात आली आहे. लोहमार्ग दूर क्षेत्र पोलिसांनी उषा गायकवाड, शरद पाटील यांचे जबाब नोंदवले आहेत.

दरम्यान याप्रकरणी रेल्वे स्थानक परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. हे दागिने गेल्या महिनाभरापूर्वी एका तांदळाच्या गोणीत सापडले. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून ते उशिरा पोलिसांकडे जमा करण्यात आले. परंतु त्यात नेमके किती दागिने होते ? पोलिसांच्या ताब्यात किती देण्यात आले ? लोहमार्ग पोलिसांनी याबाबत रात्री उशिरा पंचनामा करण्याचे कारण काय ? अशा चर्चा आहेत.