आमदाराच्या शिक्षण संस्थेतील परीक्षा केंद्रावर शिक्षण विस्तार अधिकारीचे बेकायदेशीर प्रवेश
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । इयत्ता बारावी परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असल्याने परीक्षा केंद्रावर कॉपी सुरू आहे की, नाही याची चौकशी व पाहणी करण्याकामी यावल येथील बीआरसी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी “धनके” यांनी बेकायदेशीरपणे आमदार शिरीष चौधरी यांच्या शिक्षण संस्थेचे अर्थात डिएन कॉलेज मध्ये गेल्याने याबाबत यावल पंचायत समिती सदस्यांच्या मासिक सभेत पं.स. सदस्य शेखर सोपान पाटील यांच्याकडून संतापजनक चर्चा करण्यात आली. दरम्यान, या धक्कादायक कृत्याला बीआरसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मीटिंगमध्ये दुजोरा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल पंचायत समितीच्या मासिक सभेत 8 रोजी शिक्षण विस्तार अधिकारी “धनके” यांना कोणताही अधिकार नसताना परीक्षा केंद्रावर तसेच इतर कार्यालयीन कामकाज करताना यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रातील गटशिक्षण अधिकारी मीच आहे. असे समजून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अचानक भेटी देऊन मुख्याध्यापकांकडून सोयीनुसार चौकशीच्या नावाखाली कायदेशीर कारवाई करण्याची व दमदाटी करून कामकाज करीत असल्याने त्याच्या मनमानी आणि बेकायदा कारभाराबाबत संतापजनक प्रश्न तालुक्यात उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच तालुक्यातील मुख्याध्यापकांचे जाबजबाब घेतल्यास मोठा भोंगळ कारभार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे बोलले जात असून गट शिक्षण अधिकारी “शेख” यांनी या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची चौकशी करून कार्यवाही करावी. अशी मागणी जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून केली जात आहे.
दि. 8 रोजी यावल पंचायत समिती सदस्य मासिक मिटिंग झाली. त्यात आदेश नसताना तालुक्यातील बारावी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकार्यांसह भरारी पथकाचे कुठलेही आदेश नसताना परीक्षा केंद्रांना भेटी का दिल्यात? आपली बीट सोडून दुसऱ्या बिट मध्ये शाळा तपासणीचा उद्देश काय? आपल्याकडे गटसमन्वयक चार्ज आहे परंतु गटसमन्वयकाचे काम एसएसए बाबत असताना आणि एसएसए मध्ये पैसा येत नाही त्याबाबत काम न करता आपण शाळा भेटी कोणत्या उद्देशाने करीत आहात? गटसमन्वयक यांनी सोमवार व शुक्रवार या दिवशी कार्यालयात हजर राहायचे असते आपण कार्यालयात हजर राहत नाहीत. याबाबत बीआरसी कर्मचारी व शिक्षण विभाग लिपिक यांना बोलावून विचारणा केली असता शिक्षण विस्तार अधिकारी कार्यालयात येत नसल्याचे सांगण्यात आले. त्यांना भरारी पथकाचे आदेश नसताना केंद्रांना भेटी देणे चुकीचे आहे. पंचायत समिती सदस्य मासिक मिटिंग मध्ये यावल पंचायत समिती सदस्य तथा गटनेते शेखर पाटील व दीपक अण्णा पाटील यांनी याबाबतीत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
केंद्र शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार पंचायत समिती सदस्य यांच्याकडे केली होती. केंद्र तपासणीचे अधिकार आदेश कुठल्याही प्राथमिक, माध्यमिक, शिक्षणाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी दिलेले नाहीत असे खात्रीलायक वृत्त आहे. असे असून सुद्धा यावल तालुक्यात शिक्षण विभागाचा कोणता अधिकारी शाळा शाळांमध्ये फिरत आहे. तसेच तपासणीच्या नावाखाली केंद्र संचालकांना त्रास देऊन पिळवणूक करीत आहे. असे करण्यामागे त्या अधिकाऱ्याच्या कार्याचा काय उद्देश आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे सभापतीपद यावल तालुक्यातच आहे. तरी शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी एवढे मुजोर कसे याबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व गटशिक्षणाधिकारी काय कार्यवाही करणार याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष लागून असल्याचे शिक्षण क्षेत्रात व यावल पंचायत समिती सदस्यांमध्ये बोलले जात आहे.