⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

पालकमंत्री साहेब आमच जळगाव शहर ‘जळतंय’, पक्षाप्रमाणे आमच्यासाठी सुद्धा उठाव कराल का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । शिंदे गटाचे आमदार तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना सलग दुसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. गुलाबराव पाटील यांनी जेव्हा शिवसेनेत उठाव केला आणि शिंदेंसोबत सत्ता त्याग करत पुढे गेले. त्यावेळी विधानसभेमध्ये त्यांनी एक नेहमीप्रमाणेच सुंदर भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की, आमचा पक्ष जळत होता, आमचं घर जळत होतं, यामुळे आम्ही हा उठाव केला आहे. गुलाबरावांचे ते भाषण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप गाजलं आणि शिंदे गटाची भूमिका त्या एका भाषणामुळे संपूर्ण महाराष्ट्राला समजली. काहींना ती पटली तर काहींना ती नाही पटली. मात्र या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे गुलाबराव पाटील ज्या जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्रात करतात त्या जिल्ह्याचं प्रमुख शहर जळगाव गेल्या अडीच वर्षापासून ‘जळतय’. मात्र त्या शहराकडे कोणीही बघायला तयार नाही. पालकमंत्री शहराच्या विकासासाठी मंत्रिमंडळात उठाव करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेना पक्ष गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमुळे वाढत नव्हता. पक्ष कमकुवत होत होता. पक्षाला वाचविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील त्या उठावात सामील झाले होते. गुलाबराव पाटील यांनी उठाव केला आणि आमचं घर जळतंय म्हणून आम्हाला उठाव करावा लागला. असं भर विधानसभेत सांगितलं. गुलाबराव पाटलांनी सत्यस्थिती मांडली आणि दोन्ही बाजूने समतोल साधला असे काही राजकारणी म्हणत होते. काहींनी गुलाबरावांच्या भाषणावर टीका देखील केली. मात्र राजकारणात हे चालणारच.

मूळ प्रश्न येतो तो जळगाव शहराचा. जळगाव शहरातला नागरिकांनी काय करायचं? जळगाव शहरात विविध प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. गेल्या अडीच वर्षांमध्ये जळगाव शहराच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांच्या पाठीची दुरवस्था झाली आहे. वाहन मोठ्या प्रमाणावर खराब होत आहेत. गाळेधारकांचा प्रश्न मार्ग लागत नाहीये. निधी मंजूर होऊनही जळगाव शहरातले रस्ते होत नाहीये, घनकचरा प्रकल्प अजूनही पूर्ण झाला नाही. वॉटरग्रेसवर टीका होतेच आहे. शहरवासियांना वेळेवर अमृतचे पाणी मिळत नाहीये, अशावेळी चारही बाजूने जळत असलेल्या जळगाव शहरासाठी नक्की उठाव करणार कोण? आणि कसा? हा प्रश्न उपस्थित होतो.

गुलाबराव पाटील यांच्याकडे उठाव करण्यासाठी एकनाथराव शिंदे यांच्यासारखे बुलंद असे नेतृत्व होते. ज्यांच्यावर विश्वास ठेवून गुलाबराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हणजेच ४० आमदारांनी महाराष्ट्रामध्ये बंड करून दाखवलं. उठाव करून दाखवला. मात्र जळगाव शहराच्या विकासासाठी स्वकीय नेत्यांकडे आग्रहाचे बंड करायला नक्की कोण पुढे येईल? गुलाबरावांच्या भरवशावर स्थानिक मनपा सदस्य जळगावकरांसाठी इतकी मोठी रिस्क घेतील का? असे अनेक प्रश्न जळगावकरांच्या मनात आहेत.

सलग दुसऱ्यांदा पालकमंत्री पद मिळाल्यामुळे जळगाव शहरातील नागरिकांच्या आशा व आकांक्षा वाढल्या आहेत. पहिल्या टप्प्यात कोरोना असल्याने गुलाबराव पाटील विकासकामांसाठी फारसे काही करू शकले नाही असे गृहीत धरले तर दुसऱ्यांदा पालकमंत्री पद मिळाल्यामुळे गुलाबराव पाटील नक्कीच जळगाव शहरासाठी काहीतरी चांगलं करतील अशी अपेक्षा जळगाव शहरातील नागरिकांची आहे. गुलाबराव पाटील यांच्या कामामुळे शहरातील नागरिकांना उठाव करावा लागणार नाही अशी अपेक्षाच नागरिक करत आहेत. मात्र जर अशाच प्रकारे जळगाव शहर जळत राहिल तर गुलाबराव पाटील स्वतः जळगाव शहरातील नागरिकांसोबत उठावात सामील होतील का? या उठावाचं नेतृत्व करतील का? हा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे.