⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

बहिणीच्या ‎साखरपुड्याला जाणाऱ्या तरुणीचा रेल्वे प्रवासात मृत्यू

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । चुलत बहिणीच्या साखरपुड्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या (राजस्थान) येथील‎ ‎२५ वर्षीय तरुणीचा पाचोरा रेल्वे ‎स्थानकावर हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये घडली. दरम्यान, या घटनेची माहिती तिच्या कुटुंबाला‎ कळवण्यात आली. युवतीचे आई-वडील‎ पुण्याहून पाचोरा येथे दाखल झाले.‎

वाघिषा संजय पोतेदार (वय २५) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी कोटा येथील रहिवासी आहे. तसेच फरिदाबाद‎ येथे खासगी कंपनीत नोकरीस होती. ती २० रोजी सकाळी हजरत निजामुद्दीन‎ (दिल्ली) रेल्वे स्थानकावरुन कर्नाटक‎ संपर्कक्रांती एक्स्प्रेसने, पुणे येथे जाण्यासाठी‎ निघाली होती. बुऱ्हाणपूर ते भुसावळ दरम्यान‎ वाघिषाची प्रकृती अचानक बिघडली. एक्स्प्रेस‎ भुसावळ स्थानकावर आल्यानंतर वाघिषाने‎ औषधे घेतली. मात्र रेल्वे जळगाव ते पाचोरा‎ ‎स्थानकांदरम्यान असताना तिची प्रकृती‎ अधिकच खालावली. गुरुवारी पहाटे साडेतीन‎ वाजता गाडी पाचोरा स्थानकावर थांबवण्यात‎ आली. वाघिषा हिला आरपीएफ व लोहमार्ग‎ पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे खासगी रुग्णालयात‎ दाखल केले. मात्र तिची प्राणज्योत मालवली.‎

तर कदाचित तिला‎ वेळीच उपचार मिळाले असते!
बुऱ्हाणपूर ते भुसावळ स्थानकादरम्यान‎ वाघिषाची प्रकृती अचानक बिघडली.‎ भुसावळ रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस‎ आल्यानंतर रेल्वेच्या डाॅक्टरांनी तिला औषधे‎ देऊन पुढील प्रवासासाठी रवाना केले.‎ त्याऐवजी तिला भुसावळात उतरवून‎ डाॅक्टरांनी भुसावळ येथील रुग्णालयात‎ दाखल केले असते, तर कदाचित तिला‎ वेळीच उपचार मिळाले असते.‎