जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२६ । जळगाव रेल्वे स्थानकानजीक एका १९ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज, शुक्रवार १५ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गणेश कोळी असे मृत तरुणाचे नाव असून प्रेमप्रकरणातून तरुणांने हे टोकाचं पाऊल उचलेल असल्याची माहिती समोर आलीय. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नेमकी घटना काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश कोळी आणि गावातीलच एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. दोघेही ४ मे पासून घरातून निघून गेले होते आणि त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात होती. आज, शुक्रवार (१५ मे) रोजी सकाळी ते जळगाव रेल्वे स्थानकावर परतले. त्यांनी स्वतःहून घरी फोन करून ही माहिती दिली. यानंतर तरुणीचा भाऊ रेल्वे स्थानकावर पोहोचला आणि तिला आपल्यासोबत घेऊन गेला. तरुणीला घेऊन गेल्यानंतर अवघ्या काही वेळातच गणेशने छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणातील सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, गणेशने रेल्वे रूळाकडे जाताना आपल्या आईला लावलेला फोन. “आई, मी मोठी चूक केली आहे. हा माझा शेवटचा कॉल आहे,” असे सांगत त्याने धावत्या ट्रेनखाली उडी घेतली. मात्र, त्याचा फोन सुरूच राहिला. हा संपूर्ण थरार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला असून, आत्महत्येच्या वेळी नेमकी काय परिस्थिती होती, याचा जिवंत पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








