Theft : रेल्वेत महिलेचे सव्वाआठ लाखांचे दागिने लांबवले

एप्रिल 15, 2022 12:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । अप गाेरखपूर-एलटीटी (१२१६६) एक्स्प्रेसने एसी फर्स्टच्या डब्यातून महू ते ठाणे प्रवास करताना दाम्पत्याच्या झोपेचा गैरफायदा घेत चाेरट्याने त्यांची पर्स लांबवली. त्यात दहा हजार रूपये राेख आणि साेन्याचे दागिने मिळून ८ लाख २६ हजारांचा ऐवज होता. बुधवारी (दि.१३) भुसावळ ते जळगाव दरम्यानच्या या चोरीप्रकरणी गुरुवारी मनमाड येथे गुन्हा दाखल होऊन तो भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग झाला.

crime 6 jpg webp

अधिक माहिती अशी की, फिर्यादी उषारॉय रामश्रय रॉय (रा. प्लॉट नंबर ४०४, हिरानंदानी इस्टेट, पोरबंदर, पाथर्डी फाटा, ठाणे) ही महिला त्यांचे पती रामश्रय रॉय यांच्यासह बुधवारी (दि.१३) अप १२१६६ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेसच्या एसी कोच ए-१ बोगीतील बर्थ क्रमांक २७ व २९ वरून महु ते ठाणे प्रवास करत हाेत्या. भुसावळ ते जळगाव स्थानकांदरम्यान या दाम्पत्यास झोप लागली. हीच संधी साधून चोरट्यांनी महिलेची पर्स लांबवली. त्यात १० हजार रूपये राेख, दोन लाख रुपये किमतीचा व पाच तोळे वजनाचा सोन्याचा हार, एक लाख रुपये किमतीची व अडीच तोळे वजनाची चेन, एक लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र, कर्णफुले, झुमके, सोन्याच्या बांगड्या असा मुद्देमाल होता.

राॅय पती-पत्नीला मनमाड रेल्वे स्थानकावर जाग आली. यावेळी पर्स चाेरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गाडीतील तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा यंत्रणांना चाेरीची माहिती दिली. राॅय यांच्या तक्रारीवरून मनमाड लोहमार्ग पोलिसांत चाेरीचा गुन्हा दाखल झाला. ही चाेरी भुसावळ-जळगाव दरम्यान झाल्याने गुन्हा तपासासाठी भुसावळ लाेहमार्ग पाेलिसांकडे वर्ग केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now