हिडीस प्रकार ! नव्या कोऱ्या रस्त्यावर २ महिन्यात पडला खड्डा

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ जानेवारी २०२३ | जळगाव शहरात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याच्या चर्चा, दावे, प्रति दावे, आरोप, प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपासून पाहिला मिळत आहेत. मात्र याचा प्रत्यय आलाय तो म्हणजे जळगाव शहरातील दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्यावर.

नूतन मराठा कॉलेज समोर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला रस्ता बांधणीला सुरुवात झाली. डिसेंबर महिन्याच्या मध्यात हा रस्ता बनवून पूर्ण झाला. मात्र या सगळ्यांमध्ये हिडीस प्रकार म्हणजे दोन महिन्यात या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे.

जळगाव शहरात रस्त्यांची बोंबाबोंब आहे. नागरिक समस्येला कंटाळले असून आपल्या समस्या मांडून अक्षरशः वैतागले आहेत. मात्र जळगाव शहरात रस्ते काही होत नाहीत हीच परिस्थिती आहे. इतकं झालं तरी देखील अखेर बांधकाम विभागाअंतर्गत जळगाव शहरातील काही मुख्य रस्ते बांधण्यात आले. मात्र या रस्त्यावरही अवघ्या दोन महिन्यांमध्ये भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या रस्त्यावरून दररोज किमान 20 ते 30 हजार नागरिक प्रवास करतात. हा मुख्य रस्ता असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र अवघ्या दोन महिन्यात या ठिकाणी खड्डा पडतोय. यामुळे या रस्त्याची खरंच निपक्षपाती पणे चाचणी करण्यात आली होती का? हा देखील सवाल नागरिक विचारात आहेत.