⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

घातक त्वचारोगामुळे मृत्यूपंथास टेकलेल्या रुग्णाला मिळाले जीवदान

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । घातक त्वचा रोग होऊन मृत्यूपंथास टेकलेल्या चोपडा तालुक्यातील ५२ वर्षीय इसमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जीवदान मिळाले. त्वचा व गुप्तरोगशास्त्र विभागाच्या वैद्यकीय पथकाने अथक प्रयत्न करून रुग्णांवर यशस्वी उपचार केले. या पथकाचे कौतुक करीत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ५२ वर्षीय रुग्णास रुग्णालयातून मंगळवार दि. २६ एप्रिल रोजी निरोप दिला.

चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील विजय श्रीराम कोळी हे ५२ वर्षीय रुग्ण त्वचा विकाराने ग्रस्त होते. त्यांना चोपडा येथील सरकारी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ८ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचे त्वचा व गुप्तरोग शास्त्र विभागाचे डॉ. संदीप गव्हाणे यांनी तपासणी केली. तपासणी केली असता रुग्णाच्या पुर्ण शरीरावर पाण्यासारखे मोठे मोठे फोड झालेले होते. त्यात नवीन फोडही सुरू झालेलं होते. पूर्ण शरीरभर फोड येत असल्याने त्याचा प्रचंड त्रास शरीराच्या आतून व बाहेरून होत होता. रुग्णाची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती. या रुग्णाला “स्टीवन जोहानसन सिंड्रोम” असा आजार जडलेला होता. या आजारामध्ये रुग्णाला वाचवता येणे अवघड असते. मात्र योग्य उपचार आणि निगराणीद्वारा डॉ. संदीप गव्हाणे यांनी उपचार सुरु केले. परिणामी दहा दिवसातच रुग्णावर योग्य ते चांगले परिणाम दिसू लागले. यामुळे रुग्ण बरा होऊ लागला आणि त्याचे प्राण वाचले. सदर आजार हा १ दशलक्ष व्यक्तीमधून १ व्यक्तीला होण्याची संभावना असते, असे डॉ.गव्हाणे यांनी सांगितले.

त्याला मंगळवारी २६ एप्रिल रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते रुग्णालयातून निरोप देण्यात आला. रुग्णावर उपचार करण्याकामी त्वचा व गुप्तरोग शास्त्र विभागाचे डॉ. संदीप गव्हाणे, डॉ. पूनम महाकाळ आदींनी परिश्रम घेतले. त्यांना औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, कक्ष क्रमांक ९ चे इंचार्ज परिचारक तुषार पाटील यांचेसह नातेवाईक, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. रुग्णालयातून निरोप देतेवेळी डॉ. तुषार सोनवणे, डॉ. प्रसाद खैरनार, डॉ. सुबोध महल्ले, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.