मेंदूज्वर निष्पन्न झालेल्या असहाय महिलेस काढले मृत्यूच्या दाढेतून
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका बेशुद्धावस्थेत व गंभीर असलेल्या महिला रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले. रुग्णाला मेंदूज्वर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिचा जीव धोक्यात होता. मात्र डॉक्टरांनी वैद्यकीय कौशल्य पणाला लावून या गरजू रुग्णाचा जीव वाचविला आहे. याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.
सोयगाव तालुकयातील कंकराळा येथील रेखा गौतम इंगळे (वय ४०) ह्या महिला रुग्णालयात ३ मे रोजी बेशुद्धावस्थेत, तापाने आजारी व उलट्या होऊन श्वसनक्रिया बंद झाल्याच्या परिस्थितीत दाखल झाल्या होत्या. त्यांना औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले. तीन दिवस कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवले. पुढील तपासण्या केल्यानंतर महिला रुग्णाला मेंदूज्वर असल्याचे निदान झाले. परिस्थिती गंभीर होती. अतिदक्षता विभागात ३ दिवस मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी वैद्यकीय कौशल्य पणाला लावत तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
महिलेचे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आले. आता सदर महिला रुग्णाला जनरल कक्षात ठेवण्यात आले असून वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहे. उपचाराकरिता वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहयोगी प्रा. डॉ. पाराजी बाचेवार, सहा. प्रा. डॉ. आस्था गणेरीवाल, उरोरोग विभागाचे प्रमुख डॉ. स्वप्नील चौधरी, कनिष्ठ निवासी डॉ. तुषार राठोड, डॉ. ऋषिकेश येऊळ, डॉ. सुबोध महल्ले, डॉ. राहुल सोनवणे आदींनी उपचार केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.