⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Black Magic : अमावस्येला सुया टोचलेली काळी बाहुली, कणकेचा गोळा समोर पडताच ‘ती’ भांबावली

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । आपण २१ व्या शतकात जगत असलो तरी काळा जादू, भूत, पिशाच, जादू टोणा मानणारा एक मोठा वर्ग आज देखील आहे. शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका गृहिणीच्या सासऱ्यांनी घेतलेली जागा न्यायालयाच्या आदेशाने त्यांना मिळाली. निकाल विरोधात लागलेल्या कुटुंबाकडून नेहमी जादूटोणा केल्याप्रमाणे अंधश्रद्धा पसरवणारे उपाय केले जाऊ लागले. आज अमावस्येला भर दुपारी घराचे गेट उघडताच सुया टोचलेली काळी बाहुली, हळदी कुंकू वाहिलेला कणकेचा गोळा समोर येऊन पडल्याने गृहिणी घाबरली. भांबावलेल्या अवस्थेत तिने प्रकार पतीला सांगितला आणि थेट पोलीस ठाणे गाठले. शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी नगर दालफड परिसरातील रहिवासी अंजली केदार भुसारी वय-३९ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आमचे घराशेजारी
1) प्रकाश रामेश्वर व्यास व त्यांची पत्नी 2) ललिता प्रकाश व्यास 3) सुशिला गोपाळ पंडित 4) विद्या गोपाळ पुरोहित 5) गौरीलाल रुपचंद पुरोहित असे गेल्या शेजारी ४० ते ४५ वर्षापासून राहतात. सदरची जागा ही आमचे वडीलोपार्जीत जागा असून माझे आजल सासरे यांनी वरील तिघांना सदरची जागा ही वापरण्यास दिलेली होती. त्यानंतर सन २००७ मध्ये माझे सासरे व पती यांनी वरील लोकांना त्यांना दिलेली जागा खाली करण्यास सांगितले असता त्यांनी सदरची जागा खाली केली नाही. तेव्हापासून ते आमचेसोबत वैर भावनेने वागत होते. त्यानंतर माझ्या पतीने सन २००७ मध्ये माझे सासरे किशोर नारायण भुसारी यांनी जळगांव न्यायालयात सदर जागेचा ताबा मिळण्याबाबत वरील लोकांविरुध्द दिवाणी स्वरुपाचा खाजगी दावा दाखल केला होता. खटल्याचा निकाल सन २०१७ मध्ये आमचे बाजुने लागल्याने तेव्हापासुन वरील लोक हे आमचेशी वैर भावनेने वागू लागले. तसेच तेव्हापासून ते लोक आमच्या घराच्या दरवाज्याजवळ उडिद, मोहरी तसेच रक्षा असे टाकुन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा मी माझ्या पतीला सदर बाबत सांगितले होते परंतु माझ्या पतीच्या सांगण्यावरुन मी सदर गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.

दि.३ फेब्रुवारी २०२२ रोजी मी माझे पती व माझा मुलगा असे आम्ही आमचे नविन घरी शिवाजीनगर दाळफड जळगांव येथे रहिवासासाठी गेलो. दि.३० मे रोजी अमावस्याच्या दिवशी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान मी माझे नेहमीप्रमाणे काम करुन घराबाहेर आली असता मला आमचे घराच्या गेटवर कोणीतरी मानवी केस व हळद कुंकू टाकलेले दिसले. सदरची हकीकत मी माझे पती नामे अँड. केदार भुसारी यांना सांगितली. त्यावेळेस मी व माझे पती आम्ही दोघांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्रीच्या वेळेस लाईट गेल्यानंतर जनरेटर सुरू होण्याच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसम हे आमचे घरावर दगड मारत असे आम्ही त्या देखील घटनेकडे देखील दुर्लक्ष केले.

काही दिवस गेल्यानंतर दि.१४ जून पौर्णीमेच्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास मी रात्री वाळत घातलेले कपडे काढायला घराच्या समोरील ओपन स्पेसमध्ये गेली तेव्हा वाळत घातलेल्या माझ्या गाऊनवर रक्त टाकलेले दिसले ते पाहून मी घाबरून गेली त्यामुळे मी माझ्या पतीला ४ दिवसानंतर पुर्ण घटना सांगितली. तेव्हा देखील आम्ही दुर्लक्ष केले.

आज दि.२८ रोजी दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान लाईट गेलेली होती. १ तासानंतर मी माझे पती यांना कोर्टामध्ये डबा देण्यास बाहेर निघाली व आमचे घराचे गेट उघडले. तेव्हा गेटावरुन कणकेचा गोळा त्यावर काळी बाहुली हळद कुंकू वाहिलेली, त्यावर पिवळ्या अक्षरामध्ये अंजली नाव लिहीलेली व त्यासोबत काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या बांधलेल्या त्या बाहुलीच्या अंगावर ठिकठिकाणी पिवळ्या रंगानी फुली करून ठिकठिकाणी सुया टोचलेल्या असे माझ्या माझ्या समोर पडले. अचानक असे काही आल्याने ते त्याला पाहून मी घाबरली व तेथून माझ्या पतीला लगेच फोनवरुन घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली व लगेच मी जळगांव शहर पो. स्टे ला तक्रार देण्यास आली.

तरी 1) प्रकाश रामेश्वर व्यास व त्यांची पत्नी 2) ललिता प्रकाश व्यास 3) सुशिला गोपाळ पंडित 4) विद्या गोपाळ पुरोहित 5) गौरीलाल रुपचंद पुरोहित यांनी संगनमत करुन आमची वडिलोपार्जित जागा त्यांनी खाली करावी म्हणून आम्ही त्यांचेविरुध्द न्यायालयात केलेल्या दाव्याचा निकाल आमच्या बाजूने लागल्याचे कारणावरुन वरील लोकांनी दि.३ फेब्रुवारी २०२२ ते दि.२८ जून २०२२ पावेतो प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी आमच्या घराच्या दाराजवळ मानवी केस व हळद कुंकू टाकलेले, काळी बाहुली हळद कुंकू वाहिलेली त्यावर पिवळ्या अक्षरामध्ये अंजली नाव लिहीलेली व त्यासोबत काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या बांधलेल्या त्या बाहुलीच्या अंगावर ठिकठिकाणी पिवळ्या रंगानी फुली करुन ठिकठिकाणी सुया टोचलेल्या असे टाकुन मला घाबरवण्याचा अथवा माझ्या जिवाचे बरे वाईट होण्याच्या उदेदशाने वरील कृत्य केल्याबाबत माझा त्यांचेवर संशय असल्याने माझी वरील लोकांविरुध्द जादूटोणा प्रतिबंध कायदा अधिनीयम 2013 कलम 3(2) सह भादवी कलम 336 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.

अंजली भुसारी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार ललित भदाणे यांनी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.