⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगावात चोरट्याने फोडला बियर बार, हजारोंची रोकड चोरली

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ मार्च २०२३ | जळगाव शहरात चोऱ्या नेहमीच होत असतात. दुचाकी चोरी तर नित्याचीच झाली आहे. रविवारी चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास ममुराबाद रस्त्यावर असलेले हॉटेल मितवा फोडून हजारोंची रोकड लंपास केली आहे. दरम्यान, घटनेची तक्रार देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीची तक्रार नोंदवून घेण्या अगोदर त्यांनाच दोन शब्द ऐकवले. विशेष पोलीस महानिरीक्षक जळगावात असताना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत असलेल्या अवैध वाळू चोरीकडे लक्ष देण्यासाठी पोलीस निरीक्षकांना वेळ नाही मात्र तक्रारदाराला उपदेश द्यायला मात्र वेळ असल्याने सर्वच आलबेल असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

शनीपेठ परिसरात राहणारे माजी उपमहापौर अनिल वाणी यांचा मुलगा चेतन वाणी याच्या मालकीची ममुराबाद रस्त्यावर हॉटेल मितवा आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून सर्व घरी गेले. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते हॉटेल उघडण्यासाठी आले असता शटर एका बाजूने उचललेले तर ड्रॉवर आणि गल्ला फोडलेला त्यांना दिसून आला. सामान अस्त्यावस्त पडलेला असल्याने हॉटेलमध्ये चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक माणिक सोनवणे हे कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी आल्यावर त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. हॉटेलमध्ये असलेले सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता चोर चोरी करताना दिसत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले. सर्व माहिती घेतल्यावर पोलिसांनी हॉटेल मालकांना तक्रार देण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात येण्याचे सांगितले.

हॉटेल मालक चेतन अनिल वाणी हे तक्रार नोंदविण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात गेले असता त्यांनी हॉटेलच्या गल्ल्यात साधारणता ५० हजार रुपये असल्याचे सांगितले. तसेच सीपीयू देखील चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तक्रारदाराची माहिती ऐकून घेण्याऐवजी निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी गल्ल्यात कुणी इतके पैसे ठेवतात का? असा उलट प्रश्न केला. अधिकारीच बाजू ऐकून घेत नसल्याने आपले काय चालणार म्हणून तक्रारदार देखील विचारत पडले. अखेर १७ हजार रोख आणि २ हजारांचा सीपीयू असा १९ हजारांचा ऐवज चोरी झाल्याची फिर्याद त्यांनी दिली.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर जळगावात आलेले असताना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाकेच्या अंतरावरून भर दिवसा मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत होती. परिसरातील एका पत्रकार नागरिकाने सोशल मीडियावर हा जाहीर मुद्दा उपस्थित देखील केला. जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील ते वाचले, तरीही वाळू चोरी सुरूच होती. पोलीस निरीक्षक कुंभार यांना हाकेच्या अंतरावर सुरू असलेली वाळू चोरी रोखण्यात रस नाही मात्र तक्रारदाराला उपदेश द्यायला वेळ होता.

चोर सोडून सं फाशी असा न्याय बाळगून असलेले पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या अशा वागणूक मुळेच शहाण्याने पोलीस ठाण्याची पायरी चढू नये असे नागरिक म्हणतात. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध वाळू वाहतूक विषयी काही दिवसापूर्वीच जळगाव लाईव्ह न्यूज आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी देखील पुरावे दिले होते मात्र त्यावर काहीही कारवाई झाली नाही.