जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच चाळीसगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजेच लग्न सोहळा आटोपल्यानंतर पंगतीमध्ये जेवणासाठी बसलेल्या नवरदेवाच्या आईजवळ असलेली दागिन्यांची पिशवी घेऊन चोरटा पसार झाला. हा सर्व प्रकार लॉन्समध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून तपास सुरु करण्यात आला आहे.

या घटनेबाबत असे की, भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनील पाटील यांच्या कन्येचा विवाह चाळीसगाव शहरातील धुळे रस्त्यावर विराम लॉन्स याठिकाणी पार पडला. पण लग्न लागल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत नवरदेवाची आई अंजली पाटील या जेवायला बसल्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ सुमारे साडेदहा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी होती. हि पिशवी त्यांनी एका खुर्चीजवळ ठेवली.
लग्नात वेगवेगळ्या नऊ प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवी नवरदेवाची आई अंजली पाटील यांच्याकडे होती. जेवण करत असताना त्यांनी ही पिशवी खुर्चीजवळ खाली ठेवली होती. हि संधी साधत अल्पवयीन असलेल्या चोरट्याने त्यांची नजर चुकवून दागिन्यांची पिशवी लांबवली. हा सर्व प्रकार लॉन्समध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.