जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२४ । भुसावळ येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. विहिरीचे खोदकाम सुरू असताना मातीचा काही भाग खचला. या घटनेत खोदकाम करणार मजूर तब्बल तीस ते चाळीस फूट खोल विहिरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. भुसावळ पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तब्बल तीन तासाच्या परिश्रमानंतर या मजुराला सुखरूप बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. शशिकांत श्रीकांत तायडे असे या मजुराचं नाव आहे.

वरणगाव रोडवरील लकीबानगर परिसरात ही घटना घडलीय. दरम्यान, उन्हाळ्यामुळे भुसावळला पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दरम्यान, लकीबानगरातील एका घरमालकाने रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील काही मजूर विहिरीच्या कामासाठी बोलावले होते. विहिरीतील कचरा काढण्यात आला. यानंतर विहिरीच्या निम्म्या भागावर सिमेंटचा धापा टाकण्यात आला

याच दरम्यान ही घटना घडली आहे. काम सुरू असताना मातीचा काही भाग कोसळला. त्यासोबत तायडे हेही खाली कोसळले आणि ते ढिगाऱ्याखाली अडकले. ही घटना त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी पवन भंगाळे, दिनेश पुरोहित, गजानन जावळे हे काही वेळातच घटनास्थळी पोहचले. त्यांनी ३० ते ४० फूट खोल ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तायडे यांना तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढले. यात तायडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.







