शरद पवारांना मोठा झटका ! राष्ट्रवादी अजित पवारांचीच, निवडणूक आयोगाचा निर्णय
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातून मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर केला आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा निकाल हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानण्यात येतोय.
सर्व पुरावे लक्षात घेऊन अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव वापरण्याचा अधिकार फक्त अजित पवार गटाला आहे आणि निवडणूक चिन्हही असेल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे.
अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे.