---Advertisement---
बातम्या राजकारण विशेष

विरोधकांना महाराष्ट्राचा बांगलादेश करायचा आहे का?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत मानले जातात. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्‍वारूढ पुतळे उभारलेले दिसतात. ते समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचे कार्य करतात. असाच एक भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदलातर्फे उभारण्यात आला होता. मात्र दुर्देव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुःखद घटना घडली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. हिंदुस्थानचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविकच आहे.

virodhak bangladesh

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. ज्यांच्या पुढाकाराने हा पुतळा उभारण्यात आला, त्या नौदलानेही या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शोक व्यक्त केला. पुतळा उभारणीत सहभागी असलेल्या शिल्पकार आणि स्ट्रक्चरल ऑडिटरवर गुन्हे दाखल करुन चौकशी समिती नेमली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच संयुक्त बैठक घेऊन नौदल आणि राज्य सरकार यांच्यात संयुक्त समिती स्थापन करण्याची घोषणा केली. शिवाय, त्याच राजकोटच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

---Advertisement---

या घटनेनंतर सरकारने आवश्यक ती पावले उचलली. मात्र त्यानंतरही मालवण येथील पुतळा पडल्यापासून महाविकास आघाडी सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार ) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सरकारविरोधात राज्यभर तीव्र निदर्शने करत आहेत. विरोधकांनी या घटनेचा निषेध करणे आणि सरकारवर टीका करणे स्वाभाविक होते. मात्र, या घटनेला राजकीय रंग देवून सध्या जो प्रकार सुरु आहे तो महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे, असे सर्वसामान्यांचे मत आहे.

विरोधकांचं अतातायीपणाचे राजकारण
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, उबाठा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. इथपर्यंत सारे ठीक होते. मात्र संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची छायाचित्रे आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. शिवप्रेमींच्या भावना भडकवणे हाच या मागचा उद्देश नव्हता ना? महाविकास आघाडीतर्फे राज्यभर ‘जोडे मोरो’ आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना राज्यात दंगली झाल्या पाहिजेत, असे अशी मुक्ताफळे उधळली, याला काय समजावे? असाही प्रश्न सर्वसमान्यांना पडला आहे.

पुतळ्यावरुन राजकारण दुर्देवी
विरोधक या संवेदनशिल विषयावर स्वत:ची राजकीय पोळी शेकत आहे. मात्र यात एक सर्वात महत्वाचा विषय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर यापैकी एकाही नेत्याने राजकोट किल्ल्यावर जावून महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले नाही. मात्र पुतळा कोसळल्यानंतर सर्व विरोधी पक्षनेते राजकोटला रवाना झाले. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावर केलेला राजकीय ड्रामा टिव्हीवर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मालवणच्या भूमीवर विरोधकांच्या आततायी वृत्तीमुळे राजकारणाचा फड रंगला, असे सिंधुदुर्ग वासियांचे म्हणणे आहे.

विरोधी पक्षाच्या गौरवशाली परंपरेला नख
महाराष्ट्राच्या राजकारणाला गौरवशाली परंपरा राहिली आहे. सत्ताधारी पक्षाचे काही चुकले तर त्यांना धारेवर धरुन सळो की पळो करुन सोडणारे विरोधीपक्ष नेते महाराष्ट्राला लाभले आहेत. मात्र या गौरवशाली परंपरेला आताच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कलंक लावला आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

मालवण येथे उबाठा गटाचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना डीवचत असताना महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, आणि उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख पक्षांचे हे प्रमुख नेते. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेला राजकीय रंग तर होताच पण त्या सोबत जातीय रंग देखील पत्रकार परिषदेत दिसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात खालच्या पातळीवरील राजकारण
आजपर्यंत कोणत्याही विरोधी नेत्याने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांचा जातीय उल्लेख कधीही केला नव्हता. तो या तीन नेत्यांच्या पत्रकार परिषदेत केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्यंगचित्रे आणि व्हिडिओ या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. “पेशव्यांचे वंशज” अशा शब्दात फडणवीसांची हेटाळणी देखील करण्यात आली. हा किळसवाणा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला शोभतो का? असा प्रश्नही मराठी माणसाला पडला आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात पन्नास वर्षे राजकारण करणाऱ्या शरद पवारांच्या उपस्थितीतच असा प्रकार होणे हे अनेकांना पटले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात सर्व जाती – धर्माचे लोक वर्षानुवषे गुण्यागोविंदाने राहत आहेत. या एकोप्याला कसा तडा जाईल ? याची भीती विरोधकांना वाटली नाही का ? असाही प्रश्न आहे. “महाराष्ट्रात मणिपूर होण्याची भीती आहे” असे विधान शरद पवार यांनी नुकतेच केले होते. सध्या राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जातींना एकत्र करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक धोरणांमुळे आज महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र, अनेकदा शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या विरोधकांनी द्वेष आणि जातीच्या राजकारणाची बीजे पेरली आहेत. 1948 मध्ये काँग्रेसने ही परंपरा सुरू केली आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही काँग्रेसच्या नेत्यांनी हा फुटीर वारसा सुरू ठेवल्याचा भाजपचा आरोप आहे.

वैयक्तिक फायद्यासाठी विकृत इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज आदिल शाह, निजाम शाह, कुतुबशाह, औरंगजेब यांच्या राजवटीविरुद्ध लढले. तरीही, विरोधक सध्या इतिहासाची विकृत आवृत्ती लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रावर अत्याचार करणाऱ्या जुलमी औरंगजेबाचे नाव असलेल्या औरंगाबादचे नाव बदलण्याची बुद्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कधीच झाली नाही.

मतांच्या लाचारीसाठी औरंगजेबवरील प्रेम उफाळून आले
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा येथे कैद केले, शाहिस्तेखानच्या सैन्याने सामान्य लोकांची लूट केली, असंख्य मंदिरे उध्वस्त केली, संभाजी महाराजांचे डोळे फोडले, त्यांची कातडी फाडून त्यांचा शिरच्छेद केला. तरीही संजय राऊत आज ‘औरंगजेबाने महाराजांचा असा अपमान कधीच केला नाही’ अशी विधाने करत आहेत. निवडणुकीच्या फायद्यासाठी आपल्याच राजावर झालेल्या अन्यायाचा विसर पडणाऱ्यांनाच शिवाजी महाराजांचे खरे दगाबाज म्हणायला हवे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ‘शिवसेना’ ठेवले, पण आज त्यांच्या वारसांना केवळ पुतळ्यांचा विचार करताच शिवाजी महाराजांची आठवण होते, असा आरोपही करण्यात येत आहे.

राज ठाकरेंची टीका खरी वाटू लागली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीवाद फोफावू लागला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने करतात. ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर संघर्षाला खतपाणी घालण्यासाठी राज अनेकदा शरद पवार आणि त्यांच्याद्वारे पोसलेल्या संघटनांवर निशाणा साधतात. मतांसाठी हताश असलेला काँग्रेस पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो हे देशाने अनेकवेळा पाहिले आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या एकत्रित मतांसाठी आता ठाकरे यांनीही अशी हतबलता दाखवायला सुरुवात केली आहे. पुतळा वादाच्या आडून महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा आणि त्याचे रूपांतर दुसऱ्या बांगलादेशात करण्याचा प्रयत्न नाही ना ? असा प्रश्न वारंवार होणाऱ्या पत्रकार परिषदांमुळे सुशिक्षित वर्गाला पडत आहे.

Shivaji Maharaj statue collapse | Maharashtra चा बांग्लादेश कोण करू पाहतय?| Oneindia Marathi

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---