⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमधून वाईट बातमी ! जिंदाल कंपनीत भीषण स्फोट, अनेक जण..

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२३ । नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर असलेल्या गोंदे गावातील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाला. आगीमध्ये काही कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही कर्मचारी हे आत अडकल्याचंही सांगण्यात येत आहे. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडलीय.

ही आग नेमकी कशी लागली याबाबतची माहिती अद्यापही समोर आली नसून या घटनेचा तपास सुरू आहे. आगीतील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझवण्यात गुंतले आहेत.

जिल्हाधिकारी गंगाधरन डी आणि पोलीस एसपी शहाजी उमप यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. नाशिक महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग भीषणपणे पसरत आहे. कारखान्यातील कच्च्या मालाच्या प्रकारामुळे आग अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

मोठा आवाज ऐकू आला
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंदाल ग्रुपची ही कंपनी इगतपुरीतील मुंढेगावजवळ आहे. सकाळी अचानक कारखान्यात मोठा स्फोट होऊन आग लागली. तेथे उपस्थित कामगारांना काही समजेपर्यंत आग वेगाने पसरू लागली आणि काही वेळातच अनेक जण जखमी झाले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीची प्रकृती गंभीर आहे. आगीमुळे कारखान्यात वारंवार स्फोट होत आहेत.