पुतण्याला पाहण्यासाठी निघालेल्या काकूवर काळाने घातली झडप ; जळगावातील दुर्दैवी घटना

जानेवारी 5, 2024 5:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच आणखी एका अपघाताची घटना समोर आली असून यात पुतण्याला पाहण्यासाठी निघालेल्या काका – काकुच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. त्यात काकूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ घडली.

JL acc jpg webp

पुष्पा गुण‌वंत पाटील (६६, रा. प्रेमनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती गुणवंत पाटील (७०, रा. प्रेमनगर) हे जखमी झाले. गुणवंत पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक असून ते पत्नी पुष्पा पाटील यांच्यासह प्रेमनगरमध्ये राहतात.त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे पती-पत्नी कोल्हे नगरमध्ये जात होते. महामार्गावर आयटीआय जवळ आलेले असताना त्यांच्या दुचाकीला भरधावं अवजड वाहनाने धडक दिली. त्यात हे दाम्पत्य खाली पडले.

त्या वेळी त्यांना काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. मयत पुष्पा पाटील यांना एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आहे. मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now