महाराष्ट्र

.. तर ‘अशा’ वाहनचालकांवर होणार थेट निलंबनाची कारवाई; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२३ । एसटी गाडी चालवताना बऱ्याच वेळा चालक फोनवर बोलताना, कानात हेडफोन घालून गाणी ऐकताना दिसून येतात. याबाबतच्या एसटी महामंडळाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. सातत्याने तक्रारी वाढत असल्याने अशातच आता एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी प्रशासनाकडून चालकांना मोबाईलवर बोलण्यास अथवा हेडफोन घालून गाणी ऐकण्यावर बंदी घालण्यात आलीय. तसेच व्हिडीओ पाहण्यासही प्रतिबंध असणार आहे.

खरंतर राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. लाखो नागरीक दररोज एसटीने प्रवास करतात. मात्र, काही चालकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे एसटी महामंडळाने अशा वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलल्यामुळे अशाप्रकारच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाकडून याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे. “एसटी बस चालवत असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत”, असं एसटी महामंडळाने प्रसिद्धी पत्रकारत म्हटलंय.

“एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी आणि सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक आणि प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते”, असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

“याबदृल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत”, अशी माहिती एसटी महामंडळाकडून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button