जळगाव जिल्हा

शरद पवारांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२३ । माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज ना.धों. महानोर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट पळसखेड त्यांच्या शेतातील आनंदयात्री या निवासस्थानी घेतली.

ना. धों. महानोर यांचे चिरंजीव डाॕ. बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर, भाऊ पुंडलिक महानोर, मुली मिरा, सरला, रत्ना व नातु शशीकांत व नातवंड यांच्याशी पारिवारिक संवाद साधला. आनंदयात्री या निवासस्थानी जवळपास अर्धा तास कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली.

पळसखेडचे भुमिपुत्र कविवर्य ना. धों. महानोर व वाकोदचे उद्योजक भवरलालभाऊ जैन हे दोघंही माझे सहृदयी मित्र. दोघांनी शेत, शेती, माती आणि पाणी यासाठी आयुष्यभर व्रतस्थपणे कार्य केले. दोघं आता नाहीत मात्र त्यांचे कार्य हे शाश्वत आहे. कविवर्य ना. धों. महानोरांविषयी बोलताना साहित्य, शेती आणि फळबागांच्या धोरणांवर शरद पवार यांनी मैत्रीपूर्ण आठवणी सांगितल्या. निसर्ग जवळून बघितला तेच त्यांच्या साहित्यात उतरले. त्यामुळेच शेतीविषयी वस्तुनिष्ठ धोरणांवर ते विधान परिषदेत भाष्य करत, अशी आठवण त्यांनी सांगितली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व राजकीय माध्यमातून त्यांनी वाचा फोडल्याचे शरद पवार म्हणाले. 1980 साली जळगाव पासून जी शेतकरी दिंडी काढण्यात आली. त्याच्या आयोजनामध्ये कवी ना. धो. महानोर यांचा पुढाकार होता. जळगाव ते नागपूर अशा निघालेल्या या दिंडीमध्ये मा. यशवंतराव चव्हाण साहेब, प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख व मी स्वतः तसेच प्रल्हादभाऊ पाटील व अनेक मान्यवर नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जावा असा आग्रह कवि ना. धों. महानोर यांनी धरून विधानपरिषदेत पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण, मृदसंधारण आणि बंधा-यांची साखळी उभी करण्याचा आग्रह धरला. त्यांनी स्वतः पळसखेडे आणि वाकोदच्या परिसरात बंधा-याची साखळी उभी करून दाखवली. रोजगार हमी योजनेशी निगडित शंभर टक्के शासकीय अनुदानावरती जी फळबाग योजना 1990-91 मध्ये महाराष्ट्रात राबविण्यास प्रारंभ केला. या योजनेची मांडणी करण्यात हि कवि ना. धों. महानोरांचा पुढाकार होता. शेती, पाणी, फळबागा व वनीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्याचा फायदा संपूर्ण राज्याला कसा होईल, हे त्यांनी आवर्जून बघितले असेही शरद पवार म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button