जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ । भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात कडगाव येथील तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्र-गुजराच्या सीमेजवळ असलेल्या डोडवा फाट्याजवळ घडलीय. या अपघात १० वर्षातील २ मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, अक्कलकुवापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावरील असलेल्या डोडवा फाट्याजवळ असलेल्या स्वागत हॉटेलसमोर गुजरात राज्यातील चिकालीकडून (ता.सागबारा जि.नर्मदा) महुपाडा गावाकडे येत असलेल्या मोटरसायकलला (क्र.एम.एच.१९ बी.बी.५३०४) भरधाव वेगाने येणाऱ्या कारने( क्र.एम एच ४३ बी.यु.८१६२) जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील असलेले मोहन कडू मोरे(वय २५), रोहित कैलास मोरे (वय १०), कुणाल एकनाथ मोरे (वय १०) हे तिघे ठार झाले असून मुक्ताबाई एकनाथ मोरे (वय ३५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. चौघे जण जळगाव तालुक्यातील कडगाव येथील रहिवासी असून ते सध्या गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील चिकाली फाटा येथे वास्तव्यास होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खापर पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर करीत आहेत.