जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२३ । भुसावळ परिसरातील नागरिकांसाठी भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, माजी नगरसेविका अनिता सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजनांचे दोन दिवसीय शिबीर श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेले होते. या शिबिरात रेशनकार्डचा १२ अंकी क्रमांक मिळवणे, धान्य मिळण्याच्या प्राधान्य योजनेत नाव समाविष्ट करणे, नवीन रेशनकार्ड तयार करणे, रेशनकार्डमध्ये नाव वाढविने, नाव कमी करणे, हरवलेले किंवा फाटलेले रेशनकार्डचे नुतनीकरण करणे या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या.
सोबतच एसटी महामंडळ आणि महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना केशरी शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज भरून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या शिबिरात १५६ नागरिकांनी विविध प्रकारच्या सुविधांचे अर्ज भरले. प्रसंगी समाजसेवक सतिष सपकाळे, भाजप कार्यकर्ते प्रा. धीरज पाटील, गोकुळ बाविस्कर, भाजपा महिला शहर अध्यक्ष अनिता आंबेकर, भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील, गिरीष राणे, विकास सपकाळे, अमोल झटकार उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजना एकाच ठिकाणी
आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि वंचित नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक कठीण परिस्थितीचा आणि अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो म्हणून महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या शासकीय इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रहिवासी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, उत्पन्न दाखला, आरोग्य दाखला संबंधित सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे समाजसेवक सतीश सपकाळे यांनी सांगितले.
उद्याही स्वीकारणार कागदपत्रे….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार समाजातील अत्यंत गरीब, वंचित वर्गातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वांगीण कल्याणाच्या दृष्टीकोनातून विविध सामाजिक कार्यक्रम आणि विविध योजनांच्या माध्यमातून देशातील आर्थिक दुर्बल वर्गातील नागरिकांना सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार उद्या, बुधवार, दिनांक १२ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान पुन्हा कागदपत्रे स्वीकारणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन असल्याचे संयोजक भाजप कार्यकर्ता प्रा.धीरज पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७७०९०४४९०४ या क्रमांकावर संपर्क साधवा.