जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२३ । आधीच नैसर्गिक संकटाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यात घाम गाळून पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याला भाव नसल्यामुळे आर्थिक संकट ओढावले आहे. कापसाला योग्य भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कापूस (Cotton) घरात पडून आहे.मात्र कापसाला कीड लागू नये म्ह्णून काही शेतकरी कापूस विक्री करीत आहे. पण यातही काही व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस मोजताना काटा मारत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार चाळीसगावातून (Chalisgaon) समोर आला आहे. मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याची आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी पोलखोल केली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
चाळीसगाव मधील लोंजे येथील मुन्ना साहेबराव चव्हाण या शेतकऱ्याने आपला 40 क्विंटल कापूस वेचणीच्या वेळी मोजून घरात ठेवला होता. गावात आलेल्या धुळे जिल्ह्यातील मूकटी येथील व्यापाऱ्याने तो कापूस (Cotton) 7800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केला. मात्र वजन केल्याच्यावेळी 40 क्विंटल कापसाचे केवळ 30 क्विंटलच वजन आले.विशेष म्हणजे सबंधित व्यापाऱ्याने मोजलेल्या मालाची रक्कम देखील शेतकऱ्याला तात्काळ दिली.
मात्र आपला 40 क्विंटल कापूस 30 क्विंटल आला, म्हणजे जवळपास 10 क्विंटल घट आल्याने शेतकऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गावातील सरपंच व इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब शेतकरी मुन्ना चव्हाण याने आणून दिली असता त्यांनी संबंधित व्यापाऱ्याला याचा जाब विचारला. तसेच झालेल्या प्रकाराची माहिती मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिली. त्यांनतर आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तोपर्यंत संबंधित व्यापारी हा तिथून फरार झाला होता.
आमदार मंगेश चव्हाण यांनी 40 किलोच्या मागे 10 ते 12 किलो कापूस म्हणजे एका क्विंटलमागे 30 ते 35 किलो जास्त कापूस मोजला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आमदारांनी सदर शेतकऱ्यांसोबत तो मोजलेला कापूस, गाडी असा मुद्देमाल घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना सदर गंभीर घटनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून घेण्याचे सांगितले. त्यांच्या फिर्यादी स्वतंत्रपणे दाखल करून घेत त्यांना न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना पोलीस निरीक्षक यांना केली.
दरम्यान, यावर बोलताना आ. चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे. सदर प्रकार अतिशय गंभीर असून अस्मानी संकटांचा सामना करत असताना आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना काही भामटे व्यापारी अश्या पद्धतीने लुटत आहेत. हा केवळ एका व्यापाऱ्याचा किंवा एका शेतकऱ्याचा विषय नसून हे मोठे सिंडिकेट आहे, काटा मारलेला कापूस मोजण्यासाठी आदिवासी समाजातील गरीब मजुरांना कामावर घेतले जाते तसेच ज्या गाडीत कापूस भरला जातो ती गाडी देखील भंगार स्वरूपातील वापरली जाते. यात काही जिनिंग वाले देखील सहभागी आहेत. त्यामुळे या सर्व सिंडिकेट चा सविस्तर तपास करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.