जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२३ । कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगांव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अनेर, करवंद, अमरावती, सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्प असे एकूण १२ मध्यम प्रकल्प, लघु ४५ प्रकल्प, को.प.बंधारे २२ व वळण बंधारे ३० असे एकूण १०९ प्रकल्प तसेच नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प असे एकूण ३, लघु ३३ प्रकल्प, को.प.बंधारे ६, वळण बंधारे २० असे एकूण ६२ तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अधिसुचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा घेणारे बागाईतदारांनी 2 मार्च ते 30 जून, 2023 या कालावधीकरीता सुरु होणारा उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये भुसार/अन्नधान्ये/चारा/डाळी/कपाशी/भुईमुग व इतर हंगामी पिकांना व बिगर सिंचनाचे पाणी वगळून उर्वरीत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करावेत.

बागाईतदारांनी आपले नमुना नं.७, ७ (अ). ७ (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दिनांक 15 एप्रिल, 2023 पर्यंत सायंकाळी 17.45 वाजेपर्यंत द्यावे.

पाणी अर्ज स्विकारण्याच्या शर्ती – पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारांनी आपआपल्या शेताचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी/नामंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये/ भुसार चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये, थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश/पाळी नसताना पाणी घेणे/मंजुरी पेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे/विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे/पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागायतदारांचे नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.
टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पिक नुकसान भरपाई देता येणार नाही. नमुद केलेल्या विहीत दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाद्वारे प्रसिध्दी करण्यात येईल. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून ३५ मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरी वाबत नमुना ७ (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील काही मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी पाणी आरक्षीत करण्यात आलेला आहे. आरक्षीत पाणी साठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधीत उपविभागाद्वारे शेतीसाठी पाणी अर्ज स्विकारले जातील. असे एन. एम. व्हट्टे, कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.








