जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । पाचोरा विधानसभा मतदार संघातील भडगाव तालुक्यात असलेल्या गिरणा नदीवरील गूढे ते नावरे पूलाच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून केंद्रीय रस्ते विकास निधीतून या पुलाच्या कामासाठी अठरा कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला. या पुलाची लांबी ३५० मीटर असून यामुळे परिसरातील नागरिकांचा सुमारे वीस किलोमीटरचा फेरा वाचणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे .येथील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य विकास तात्या पाटील व परिसरातील नागरिक व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही बहुप्रलंबित मागणी आ.किशोर अप्पा पाटील यांच्या कडे लावून धरली होती अखेर आमदारांच्या पाठपुराव्यामूळे हा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यातील.खेडगाव, जुवार्डी, आडळसे, नावरे, वाडे, गुढे गोंडगाव, कजगाव, पथराड ,पेंडगाव, मळगाव ,बांबरुड पाटस्थळ या भडगाव तालुक्यातील गावांना मोठा फायदा होणार आहे. या परिसरात विविध प्रकारच्या शेतमालाच्या दळणवळणास गती मिळणार असल्याने शेतकरी बांधवांना याचा अधिक लाभ मिळणार आहे.
दरम्यान या पुलाच्या कामासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण, ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचे सहकार्य लाभल्यामुळे मतदार संघाच्या वतीने आ.किशोर अप्पा पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे तर परिसरातील जनतेने आमदार किशोर अप्पा पाटील यांचे आभार मानले आहे.