जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन पाटील । सध्या राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. यात आमचं गाव म्हणजेच चितोडा (ता.यावल, जि जळगाव) इथल्या ग्रामपंचायत निवडणूक देखील होणार. मंग आता निवडणूक म्हटली की, ‘धुरळा’ उडणारच.. यात तर उमेदवारांचे निवडून येण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न तर राहतातच.. पण उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष जास्तच दिसून येतो. उमेदवार असलेले भाऊ दादांसाठी कार्यकर्त्यांकडून तर त्यांच्या वार्डात फिल्डिंग लावणी सुरु असते. अहो मात्र, निवडून आल्यानंतर हेच तुमचे भाऊ दादा गावाच्या विकासाच्या मुद्द्याच्या वेळी कुठे जातात?? फक्त आम्ही विकास केल्याच्या नावावर स्वतःचे पुंग्या वाजवून घेतात. त्यामुळेच आताच वेळ आहे, भाऊ, दादा सोडा,गावाच्या विकासाचं बघा..!
निवडणूक जाहीर होताच बऱ्याच गावाचं वातावरण सोबतच राजकारण देखील बदलून जाते. यंदाच्या निवडणुकीत आमच्या (चितोडा) गावात बरेच नवीन चेहेरे आपली संधी आजमावून पाहत आहेत. तर जुने चेहरे देखील रिंगणात उतरले आहे. गाव म्हणावं तेवढं मोठेही नाही आणि लहानही नाही.. मात्र, ग्रा.पं.च्या निवडणुकीवेळी गावातील नागरिक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून गावाचा विकास व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करत असतो.
गावकऱ्यांची अपेक्षा ही स्वाभाविकच असते. प्रचारावेळी निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार देखील आपल्या वार्डातील लोकांना मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासने देतात..एवढंच काय प्रचारावेळी तर कार्यकर्त्यांचा आपला उमेदवार भाऊ दादांसाठी तर वेगळेच जयघोष, जल्लोष सुरु असतो. जणू मोठी निवडणुकीची प्रचार रॅली असावी.. कार्यकर्त्यांचा देखील आपल्या उमेदवार भाऊ, दादांसाठीचा जल्लोष करणे स्वाभाविकच आहे. पण बाकी मतदारांचे काय??
मतदाराने देखील कुणाच्या आश्वासनाला बळी न पडत आपला योग्य तो उमेदवार निवडून द्यायला हवा. मतदानावेळी काही मतदार पैसा, दारू, मटन याचे स्वार्थी असतातच.. अहो पण हा स्वार्थीपणा तुम्हाला पाच वर्ष झुकलेला ठेवतो त्याच काय. तुम्हाला मिळालेले आश्वासने पूर्ण होतात?? उमेदवारांचे निवडणुकीपूर्वी अमुक-टमूक करण्याचे आश्वासने हे निवडून आल्यानंतर हवेत विरले जातात. तुमच्या वार्डातील रस्ते, गटारी, पाण्याचं सोडा साधा तुमच्या वार्डातील लाईट देखील वेळेवर बदलून दिला नाही..
एरवी गावाचा विकास होतो किंवा होत नाही.. हे गावातील नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहतच असतो. आपआपल्या वॉर्डातील मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी उमेदवार किती प्रयत्नशील असतात हे दिसूनच येते. पण गेल्या काही वर्षात तुमच्या गावाचा विकास झालाय का? हे समजण्यात तर नागरिक अज्ञाती तर नाहीच.. असो पण येणाऱ्या काळात गावाचा विकास घडवून आणण्यासाठी आता निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून खरे प्रयत्न होणे गरजेचे आहे. गावातील रस्ते, गटारी, पाण्याचा प्रश्न हे प्रत्येक खेड्यातील मूलभूत सुविधा राहातातच.. यासाठी शासन वित्त आयोगाद्वारे अनुदान पुरवतेच.
आमच्या चितोडा गावी अंदाजित ६० ते ६५ लोकं हातमजुरी करणारे आहेत. हातमजुरी करून ते त्यांचे उदर्निवाह करतात. ते राजकारणातून एकदम अलिप्त आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांना ग्रामपंचायतच्या राजकारणात कोणताही रस नाही. पण त्यांच्या चुकीच्या उमेदवारामुळे त्यांना पाच वर्षाचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यांच्या भागातील रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे यासह आदी प्रश्न ते निवडणूक देणाऱ्या उमेदवारांकडून सोडविले गेले पाहिजे.
मागील गेल्या काही वर्षात गावाचा विकास खुंटीला टांगला आहे. ग्रामपंचायतने विकासाच्या नावावर फक्त स्वतःच्या पुंग्या वाजवून घेत गाजा वाजवला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वार्डातील / गावातील विकास घडवून आणायचा असेल तर भाऊ दादा सोडा आणि गावाच्या विकासाकडे बघा..