जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२२ । आजवर सुरेश नाना चौधरी यांनी कुणाला घडविले हे मला ठाऊक आहे. सध्या माझ्या कानावर आले की सुरेश नानाच्या मागे कुणी लागले आहे. विरोधकांनी लक्षात ठेवावे, ज्याच्यासोबत तेली तो भाग्यशाली आणि ज्याच्या मागे लागला तेली त्याची डिपॉझिट गेली, असा टोला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी नाव न घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लगावला आहे.
तेली समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळतर्फे रविवारी राज्यस्तरीय वधू वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी मॉडर्न गर्ल्स हायस्कूल, स्टेट बँक जवळ जळगाव येथे समाज रत्न स्व.आर.टी.अण्णा चौधरी नगर उभारण्यात आले होते. मेळाव्यात जवळपास १५०० पेक्षा अधिक वधू-वरांनी नोंदणी केली होती.
यावेळी ‘बंध रेशमाचे’ या वधू-वर परिचय सूची पुस्तकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यास उपस्थित वधू – वर, पालक व समाज बांधवांसाठी मोफत भोजन, चहा, कॉफी व पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. गेले दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्याने समाजाचा मोठा उपक्रम पार पडला नव्हता यंदा मात्र जोरदार गर्दी दिसून आली. मेळाव्याला महाराष्ट्रसह गुजरात, मध्यप्रदेश येथील तेली समाज बांधवांची उपस्थिती होती.
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी बऱ्याच दिवसांनी पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील देखील प्रत्युत्तर देणार यात शंकाच नाही.