जळगावात भरधाव डंपरने घेतला उच्चशिक्षित तरुणीचा जीव

नोव्हेंबर 16, 2022 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरात भरधाव डंपरने एका उच्चशिक्षित तरुणीचा जीव घेतला आहे. महामार्गावरील शिव कॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर डंपरने भाऊ बहीण जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बहिणीचा जागीच मृत्यू झाला. तर या दुर्दैवी अपघातात तरुणीचा भाऊ सुदैवाने बचावला आहे. मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (वय-२० वर्ष) रा. खोटे नगर, जळगाव असे मयत तरुणीचे नाव आहे.

jalgaon accident jpg webp

मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे ही शहरातील आयएमआर महाविद्यालयात बॅचलर ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए)च्या तृतीय वर्षाला नियमित शिक्षण घेत होती. त्यासोबतच ती सीए फाउंडेशनचा कोर्सही करत होती. दरम्यान,बीबीएच्या अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाची परीक्षा देऊन घरी मनस्वी ही भावासह मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) वरून घरी जात होती.

यादरम्यान, राखेने भरलेला एमएच १९ सीवाय ३३११ या क्रमाकांच्या या डंपरने जळगावकडून धुळ्याकडे जात असताना महामार्गावरील शिव कॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर भाऊ बहीण जात असलेल्या मोपेड दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील मनस्वी ही तरुणी रोडवर पडली, तिच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (वय २५ रा. खोटे नगर, जळगाव) हा थोडक्यात बचावला आहे. दरम्यान, मनस्वी ही गर्जना या युवकांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष सोनवणे यांची मुलगी आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी राखाने भरलेला डंपर ताब्यात घेतला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरु होते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now