जळगाव जिल्हाभुसावळ

भुसावळातील वृत्तपत्र हॉकर्स बांधवांची दिवाळी झाली ‘गोड’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता इतकेच नव्हे पण कोरोनाच्या बिकट काळातही अखंडीतपणे वाचकापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्यासाठी झटणार्‍या वृत्तपत्र हॉकर्स बांधवांची दिवाळी शहरातील विघ्नहर्ता पब्लिकेशनने गोड केली. शहरातील तेरापंथ भवनात विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी यांनी 68 हॉकर्स बांधवांना साडी, ड्रेस व मिठाईचे वाटप करीत बांधीलकी जोपासली. गत पाच वर्षांपासून विघ्नहर्ता पब्लिकेशनच्या माध्यमातून हा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे.

या कार्यक्रमास ‘दिव्य मराठी’चे राज्य वितरण प्रमुख प्रेमकुमार प्रसाद, खान्देश युनिट हेड संजीव पाटील, वितरण विभागप्रमुख कलीम खान, रशीद बाबा आश्रमाचे गादीपती जितेंद्र नेवे (छोटू बाबा), विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी, जय निमाणी आदी उपस्थित होते. शहरातील वृत्तपत्र विक्रेते तिन्ही ऋतूंमध्ये सेवा देतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून या विक्रेत्यांना वाचकापर्यंत अंक पोहोचवत आपली व्यवसायाप्रती त्यांनी निष्ठा दाखवून दिली. प्रतिकूल परीस्थितीत आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढणार्‍या हॉकर्स बांधवांप्रती संवेदना जोपासत भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे संचालक रवींद्र निमाणी यांनी शनिवारी मान्यवरांच्या हस्ते 68 बांधवांना साडी, पँटशर्ट कापड, नमकीन व मिठाईचा बॉक्स देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी शंतनू गचके, देवेेंद्र (बंटी) निमाणी, जय निमाणी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीता बेदरकर, बबलू ठाकूर आदींनी सहकार्य केले.

हॉकर्स बांधव दिव्य मराठी व विघ्नहर्ता परिवाराशी जुळलेले आहेत. त्यांच्यासह कुटुंबियांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या चेहर्‍यांवर हास्य उमलावे या दृष्टीने केलेला हा छोटासा प्रयत्न असल्याचे विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवींद्र निमाणी म्हणाले. डिजिटल युगात वृत्तपत्राचे महत्व आजही अबाधीत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य अंग असलेल्या वृत्तपत्राला पहाटेच वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र हॉकर्स बांधवांचे योगदान मोठे आहे. समाजातील या उपेक्षीत घटकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचेही निमाणी म्हणाले.

Related Articles

Back to top button