जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेज जवळील इंदिरा नगरातील रहिवासी असलेल्या ६० वर्षीय महिलेचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी दोन वाजेपूर्वी रींगरोड भागातील शिवदत्त नगरातील पालिकेच्या दवाखान्याजवळ ही दुर्घटना घडली. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
वत्सलाबाई शिवा हतांगडे (60) असे मयत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरीष भोये, प्रशांत सोनार, अयाज शेख यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. महिलेच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून महिलेचे विच्छेदन शनिवारी केले जाणार आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गौरव मोरे (रा.शिवदत्त नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या माहितीवरून हवालदार विजय नेरकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
शहरात वीज कंपनीच्या अनेक ठिकाणी तारा लोबकळेल्या आहे. वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे एका महिलेचा जीव गेला आहे. या प्रकरणात चौकशी होऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुध्दा वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वीज कंपनीविरूध्द दाखल होऊ शकेल, असे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले.