जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ३ ऑक्टोबर रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या दोन सत्रांत झालेल्या या महायागात १८ जोडपे सहभागी झाले होते. अत्यंत चैतन्य व भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या साक्षीने हा महायाग झाला.
नऊ हा मंगळग्रह देवाचा शुभांक मानला जातो. या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात प्रकाश निका पाटील, विनिता महिंद, भागवत बापू पाटील, ऍड. के. व्ही. कुलकर्णी, इंजि. गोकुळ बोरसे, आबासाहेब भदाणे, जितेंद्र पाटील व नंदकिशोर पाटील या सपत्नीक मानकरींच्या साक्षीने माता मंगळेश्वरी भूमिमातेची प्रतिमा सकाळी नऊ वाजता अत्यंत विलोभनीय स्वरूपात सजावट करून प्रतिष्ठापित करण्यात आली. आवाहन पूजा झाली. गणपती पुण्याहवाचन मंडल, गौर्यादि मातृका मंडल, चतुःषष्ट योगिनी मंडल, वास्तु मंडल, क्षेत्रपाल मंडल, सर्वतोभद्र मंडल, सूर्यादि नवग्रह मंडल, चतुषष्टि भैरव देवता मंडल व ईशान्य रुद्र मंडल स्थापित करण्यात आले.
दुपारच्या सत्रात पद्माकर बडगुजर, मंदाकिनी पाटील, लीलाधर पाटील, सुनील शिंपी, मनोज शिंगाणे, रजनीकांत भामरे, संजय श्रीराम पाटील, नंदलाल पाटील, नवनीत पाटील व मनोज पाटील या सपत्नीक मानकरींच्या हस्ते पाठांचे हवन करण्यात आले. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी पूर्णाहुती केली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास महाआरतीने महायागाचा समारोप झाला. प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, अक्षय जोशी, मेहूल कुलकर्णी व हेमंत गोसावी यांनी निरूपणासह पौरोहित्य केले. अंकुश जोशी यांनी नाल वर साथसंगत केली. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, आनंद महाले, डी. ए. सोनवणे यांच्यासह मंदिरातील सेवेकरींनी महायाग यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.