५ ऑक्टोबरपासून नावनोंदणी सुरू, कायमस्वरूपी मोफत सेवा केंद्र होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था व राज्यभर आरोग्य सेवेसाठी कार्यरत असलेल्या रेड स्वस्तिक सोसायटी याच्या संयुक्त विद्यमाने २९, ३० व ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी मंगळ ग्रह मंदिरात होणाऱ्या आरोग्य महाशिबिराचे नियोजन करण्यासाठी २ रोजी मंगळ ग्रह मंदिरात बैठक झाली. यात रेड स्वस्तिक सोसायटी व मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी, तालुक्यातील अनेक ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, वि. का. सोसायटीचे चेअरमन, रोटरी क्लब व लायन्स क्लबचे सदस्य, आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
येत्या ५ ते २० ऑक्टोबर २०२२ दरम्यान मंगळग्रह मंदिरात येऊन रुग्णांना नावनोंदणी करता येईल.त्यानंतर येणाऱ्या रुग्णांना शिबिराचा लाभ मिळणार नाही. बैठकीच्या प्रारंभी प्रांताधिकारी सीमा अहिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, रेड स्वस्तिक सोसायटीचे सहमहाव्यवस्थापक रोशन मराठे, राज्य समन्वयक जे. बी. पाटील, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. कुणाल चौधरी, तालुका समन्वयक महेश पाटील, औरंगाबाद येथील संजय चव्हाण, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,उपाध्यक्ष एस.एन.पाटील,सचिव एस.बी.बाविस्कर,सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, लायन्स क्लबचे अध्यक्ष व खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडा, डॉ. अक्षय कुलकर्णी. डॉ. नरेंद्र सोनवणे, सुंदरपट्टीचे सरपंच सुरेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डिगंबर महाले यांनी प्रास्ताविकात आरोग्य महाशिबिर आयोजनाचा उद्देश सांगून लवकरच कायमस्वरूपी मोफत आरोग्य सेवा केंद्र व बेरोजगारांना हमखास रोजगार मिळवून देणारे सेवा केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले. सीमा अहिरे म्हणाल्या की, गेल्या साडेतीन वर्षांपासून मंगळग्रह सेवा संस्था नेहमीच विविध आपत्तीप्रसंगी सहकार्य करीत आहे. आरोग्य महाशिबिरासारख्या उपक्रमासाठी शासकीय स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. रोशन मराठे म्हणाले की, राज्यातील दीडशे हून अधिक रुग्णालये रेड स्वस्तिक सोसायटीशी जुळली आहेत. सुमारे ८७ लाख लोकांना आजवर आरोग्य सेवेचा लाभ मिळाला आहे. मंगळग्रह मंदिरात होणाऱ्या शिबिरात लाखो रुपये खर्चाचे विविध उपचार, आरोग्य चिकित्सा, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. तसेच काही उपचार व शस्त्रक्रिया नाममात्र दरात होतील. शिबिरात येणाऱ्यांसाठी जात, धर्म व उत्पन्नाची कोणतीही अट नसेल.
याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे (रोटवड), पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, उदय खैरनार, प्रा.सुभाष पाटील, आनंद महाले, डी. ए. सोनवणे , सुनीता कुलकर्णी, उज्वला शाह, प्रशांत सिंघवी, विनोद अग्रवाल, विनोद कदम,डॉ.विशाल बडगुजर, डॉ.शरद बाविस्कर, डॉ.मिलिंद नवसारिकर, डॉ.विजय पवार, प्रितपालसिंघ बग्गा ,अमोल पाटील, आर. जे. पाटील, राहुल पाटील, जी. एस. चौधरी, एम. जी. पाटील, व्ही. व्ही. भदाणे, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, आशिष चौधरी, पुषंद ढाके आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.